वृत्तसंस्था/ पॅरीस
जुलै महिन्यात होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून स्वीसचा पुरूष टेनिसपटू तसेच माजी ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता स्टॅन वावरिंकाने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घेणाऱया खेळाडूंच्या यादीमध्ये वाढ होत आहे. रूमानियाची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू सिमोना हॅलेपनेही दुखापतीमुळे ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. सध्या लंडनमध्ये सुरू असलेल्या विंबल्डन स्पर्धेत तिने आपला सहभाग दर्शविलेला नाही.
स्वीसच्या 36 वर्षीय वावरिंकाने यापूर्वी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत तीनवेळा ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत तसेच त्याने 2008 च्या बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेत रॉजर फेडरर समवेत पुरूष दुहेरीचे सुवर्णपदक मिळविले आहे. वारिंकाच्या डाव्या पायाच्या तळव्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. 23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून टेनिसपटू राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, सिमोना हॅलेप, थिएम आणि वावरिंका यांनी माघार घेतली आहे.