वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारात भारताचे दीपक काब्रा यांची पंच म्हणून निवड झाली आहे. या स्पर्धेत पुरूषांच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये काब्रा पंचाचे काम पाहणार आहेत.
ऑलिंपिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स प्रकारात पंचगिरी करणारे दीपक काब्रा हे भारताचे पहिले पंच आहेत. 33 वर्षीय दीपक काब्रा महाराष्ट्रातील रहिवासी आहेत. गुवाहाटीमध्ये 2007 साली झालेल्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत काब्रा यांनी जिम्नॅस्टिक्स प्रकारात आपला सहभाग दर्शविला होता. 2005 ते 2009 या कालावधीत दीपक काब्रा हे गुजराथ राज्याचे जिम्नॅस्टिक्स चॅम्पियन आहेत. 2018 साली झालेल्या आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडास्पर्धामध्ये दीपक काब्रा यांनी जिम्नॅस्टिक्स प्रकारात पंचगिरी केली होती. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत जिम्नॅस्टिक्स प्रकारात भारतातर्फे प्रणती नायक ही एकमेव महिला जिम्नॅस्ट सहभागी होत आहे. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या दीपा कर्माकरचे पदक थोडक्यात हुकले होते.