टोकियो : टोकियो 2021 आयोजन समिती अध्यक्ष योशिरो मोरी आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असून यामुळे एक वर्ष लांबणीवर टाकली गेलेली ही स्पर्धा आता तरी होणार की नाही, यावर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांबाबत आक्षेपार्ह टिपणी केल्याने वादाच्या भोवऱयात सापडल्याने त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत योशिरो मोरी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मोरी यांनी राजीनामा दिल्यास जपान फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष व ऑलिम्पिक क्रीडाग्रामाचे मेयर साबुरो कावाबुची यांची आयोजन समिती अध्यक्षपदी वर्णी लागेल, असा होरा आहे.
अलीकडेच जापनीज ऑलिम्पिक समिती कार्यकारिणीची बैठक झाली, त्यावेळी योशिरो मोरी यांनी ‘महिला अधिक बोलतात’, अशी टिपणी केली आणि त्यावरुन मोरी यांच्यावर बरीच टीका झाली. 83 वर्षीय मोरी यांनी नंतर याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आयोजन समितीच्या प्रवक्त्याने मात्र याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दर्शवला. योशिरो मोरी यांनी एप्रिल 2020 मध्ये जपानचे पंतप्रधानपद भूषवले आहे.