माजी सेंटर फॉरवर्ड, विद्यमान साहायक प्रशिक्षक शिवेंद्र सिंग यांचे प्रतिपादन
बेंगळूर / वृत्तसंस्था
‘जागतिक स्तरावरील सर्वात तंदुरुस्त, समतोल संघांमध्ये सध्याच्या भारतीय संघाचा प्राधान्याने समावेश होतो आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपला संघ पदक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक असेल’, असा आत्मविश्वास माजी सेंटर फॉरवर्ड व विद्यमान साहायक प्रशिक्षक शिवेंद्र सिंग यांनी व्यक्त केला. टोकियो ऑलिम्पिक दि. 23 जुलैपासून सुरु होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवेंद्र सिंग यांनी संघाच्या तयारीबाबत माहिती दिली.
‘स्पीड, शार्पनेस व स्किलवर आमचा पूर्ण भर आहे. टोकियोमध्ये पोहोचताना आपले खेळाडू पूर्ण तंदुरुस्त असतील, याची आम्ही काटेकोर काळजी घेतली. सरावात अनेक ड्रिलचा समावेश केला आणि याचेच फलित म्हणून ते जागतिक स्तरावरील सर्वात तंदुरुस्त संघांपैकी एक आहेत. ऑलिम्पिक पदकासाठी ते निश्चितपणाने प्रबळ दावेदार असतील’, असे शिवेंद सिंग यांनी हॉकी इंडियाने जारी केलेल्या पत्रकातून म्हटले आहे.
‘मी प्रदीर्घ काळ खेळाडू राहिलो आहे. त्यामुळे, साहायक प्रशिक्षकपदाच्या नव्या जबाबदारीशी जुळवून घेणे आव्हानात्मक होते. मला त्यासाठी काही वेळ द्यावा लागला. मात्र, साहायक पथकातील सहकारी व खेळाडूंमुळे मला ते शक्य झाले’, असे शिवेंद्र यांनी पुढे नमूद केले. शिवेंद्र यांचा 2010 मध्ये सुलतान अझलन शाह चषक रौप्य विजेत्या भारतीय संघात समावेश होता. सध्या त्यांच्याकडे प्रशिक्षण व सामन्यातील कामगिरीचा आढावा व विश्लेषणाची जबाबदारी आहे.
प्रशिक्षक या नात्याने जी प्रगती झाली, त्याचे श्रेय शिवेंद यांनी मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांना दिले. ‘ग्रॅहम अतिशय शांत, संयमी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. प्रशिक्षण देत असताना ‘टीम-फर्स्ट’ हा त्यांचा दृष्टिकोन असतो. पथकातील प्रत्येकाला ते प्रशिक्षणात सामावून घेतात आणि इनपूट घेतात’, असे शिवेंद सिंग पुढे म्हणाले.