नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय मल्ल सुमित मलिक ब चाचणीत देखील दोषी आढळून आला असून जागतिक कुस्ती संघटनेने त्याच्यावर 2 वर्षांची बंदी लादली आहे. 28 वर्षीय सुमितला एका आठवडय़ाची मुदत दिली गेली असून या कालावधीत त्याला ही बंदी स्वीकारावी लागेल किंवा त्याविरोधात दाद मागता येईल. या बंदीमुळे सुमितला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही.
मागील महिन्यात सोफिया वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायर इव्हेंटदरम्यान घेतलेल्या उत्तेजक चाचणीत सुमित दोषी आढळून आला होता. आश्चर्य म्हणजे त्याच स्पर्धेच्या माध्यमातून त्याने टोकियो ऑलिम्पिकसाठी 125 किलोग्रॅम वजनगटातून पात्रता सिद्ध केली होती. सुमितचे ब चाचणीचे नमुने दि. 20 जून रोजी घेतले गेले आणि चाचणीनंतर बंदी असलेल्या दव्याचे अंश आढळून आले. सुमितने गुडघ्याच्या दुखापतीवर इलाज म्हणून वेदनाशामक गोळय़ा घेतल्याचा दावा यापूर्वी केला होता.
‘सुमित मलिक दुसऱया चाचणीतही दोषी आढळून आला असून जागतिक संघटनेने दि. 3 जूनपासून त्याच्यावर 2 वर्षांची बंदी लादली आहे. एका आठवडय़ाच्या कालावधीत त्याला याविरोधात दाद मागता येईल. अन्यथा त्याला बंदी स्वीकारावी लागेल’, असे भारतीय कुस्ती फेडरेशनमधील एका सूत्राने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. रोहतकस्थित सुमितच्या निकटवर्तियांनी सध्या वकिलांशी चर्चा सुरु असल्याचे नमूद केले.
भारतीय कुस्ती फेडरेशनमधील काही पदाधिकाऱयांच्या मते स्टेरॉईड नव्हे तर स्टय़ुमिलेटचे अंश आढळून आले असल्याने सुमितने याविरोधात दाद मागणे अधिक योग्य ठरेल. विविध ठिकाणी सुरु झालेल्या ऑलिम्पिक क्वॉलिफायर्सपूर्वी राष्ट्रीय शिबिरादरम्यान मलिकला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्याने एप्रिलमध्ये आशियाई क्वॉलिफायर्समध्ये सहभाग घेतला. मात्र, त्याला तेथे कोटा प्राप्त करता आला नव्हता. पुढे आशियाई चॅम्पियनशिपमध्येही त्याला पदकाविना परतावे लागले.
मे मध्ये सोफियात वर्ल्ड ऑलिम्पिक क्वॉलिफायर्समध्ये मात्र अंतिम फेरीत पोहोचत त्याने ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली. पुढे दुखापतीचा त्रास वाढल्याने त्याने अंतिम फेरीतून माघार घेतली होती. आता 2 वर्षांच्या बंदीविरोधात जरी दाद मागितली तरी सुनावणी होऊन त्यावर निकाल येईतोवर ऑलिम्पिक स्पर्धा झालेली असेल. त्यामुळे, ऑलिम्पिकला त्याला मुकावे लागेल, हे निश्चित मानले जाते.