आरोग्य यंत्रणेला धोका उद्भवण्याचा जपानमधील आघाडीच्या दैनिकाचा इशारा, स्पर्धा उंबरठय़ावर असताना अनिश्चितता कायम
टोकियो / वृत्तसंस्था
प्रलंबित आगामी टोकियो ऑलिम्पिकला अवघ्या दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी शिल्लक राहिला असला तरी स्पर्धेबद्दल अनिश्चिततेचे वातावरण दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. बुधवारी जपानमधील ‘असाही शिम्बून’ या वृत्तसमूहाने ही स्पर्धा रद्द करावी, अशी जाहीर मागणी केली. जपानमधील एखाद्या बडय़ा प्रसारमाध्यमाने अशी थेट मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिम्बून वृत्तसमूह टोकियो ऑलिम्पिकच्या मुख्य प्रायोजकांपैकी एक आहेत.
जपानमधील काही स्थानिक वृत्तपत्रांनी ऑलिम्पिकविरोधी भूमिका यापूर्वीच मांडली आहे. मात्र, असाही शिम्बून हा तेथील बडा वृत्तसमूह असून त्यांच्या या मागणीमुळे ऑलिम्पिकविरोधी मोहिमेला आणखी धार आली आहे.
पूर्वनियोजित रुपरेषेनुसार, टोकियोतील ऑलिम्पिक गतवर्षी होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाच्या अस्मानी संकटामुळे ऑलिम्पिक एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला गेला. आता यासाठी अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी अनिश्चितता मात्र कायम आहे.
‘सध्या ऑलिम्पिक आयोजित करण्याची ही योग्य वेळ अजिबात वाटत नाही. पंतप्रधान सुगा यांनी ऑलिम्पिक रद्द करत असल्याची घोषणा करावी’, अशी मागणी असाही शिम्बून दैनिकाने आपल्या स्तंभात मांडली. असाही शिम्बूनच्या 5.16 दशलक्ष प्रती वितरित होतात. याशिवाय, त्यांच्या सायंदैनिकाचा खप 1.55 दशलक्ष इतका आहे. अर्थात, या वृत्तसमुहाने जाहीर विरोध दर्शवला असला तरी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती किंवा जपान ऑलिम्पिक संघटनेने मात्र स्पर्धा होणारच, ही आपली भूमिका कायम ठेवली आहे.
वरिष्ठ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती सदस्य रिचर्ड पाऊंड यांनी मागील आठवडय़ात जपानमधील जिजि प्रेसला दिलेल्या मुलाखतीत यंदाची ऑलिम्पिक रद्द करण्याचा निर्णय जूनअखेरपर्यंत घेता येऊ शकतो, असे म्हटले होते. या ब्रिटीश मेडिकल जर्नलने अगदी मागील महिन्यातही ऑलिम्पिक आयोजनाबद्दल आणखी एकदा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे नमूद केले होते.
दरम्यान, ‘असाही शिम्बून’ दैनिकाने आयोजकांना नागरिकांच्या संवेदनांशी काही देणेघेणे नसल्याची टीका यावेळी केली. मंगळवारी अमेरिकेने कोणत्याही कारणासाठी जपानचा प्रवास करु नये, अशी घोषणा केली. मात्र, या घोषणेमुळे ऑलिम्पिकवर काहीही फरक पडत नाही, अशी भूमिका जापनीज आयोजकांनी घेतली आहे. जपानमधील 60 ते 80 टक्के नागरिकांनी ऑलिम्पिकविरोधी भूमिका घेतली असून काही आठवडय़ांपूर्वी ऑनलाईन पेटिशनमध्ये 4 लाखापेक्षा अधिक नागरिकांनी ऑलिम्पिक रद्द करा, अशी मागणी स्वाक्षरीद्वारे नोंदवली. टोकियो व ओसाका या दोन मोठय़ा शहरात यापूर्वीच दि. 31 मे पर्यंत आणीबाणी जाहीर केली गेली आहे तर पूर्ण देशात फक्त 2 टक्के नागरिकांचेच दुहेरी लसीकरण पूर्ण झालेले आहे.
15 हजार ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक ऍथलिटस्, तितकेच पंच, पदाधिकारी, पुरस्कर्ते, ब्रॉडकास्टर्स व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जपानमध्ये या निमित्ताने येणार असून तूर्तास फक्त विदेशी चाहत्यांना येण्यास मज्जाव केला गेला आहे. ऑलिम्पिक व्हेन्यूवर देशातील किती चाहत्यांना प्रवेश दिला जाईल, हे अद्याप जाहीर केले गेलेले नाही.
जपानमधील 80 टक्के नागरिकांना ऑलिम्पिक रद्द केली जावी किंवा लांबणीवर टाकली जावे, असे स्पष्टपणे वाटते. मात्र, सध्याचे चित्र पाहिले तर ऑलिम्पिक जपानवर अक्षरशः लादण्याचा प्रयत्न होतो आहे.
-जपानमधील सॉफ्टबँक ग्रूप कॉर्पोरेशनचे संस्थापक मासायोशी सन.
आयओएने लसीकरणाची माहिती मागवली
नवी दिल्ली ः भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) देशभरातील विविध नॅशनल फेडरेशन्सकडून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या किती खेळाडूंचे लसीकरण झाले आहे, याची माहिती मागवली आहे. आयओएचे अध्यक्ष नरिंदर बात्रा व महासचिव राजीव मेहता यांनी ही माहिती गुरुवारपर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे.
प्रलंबित टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताचे 90 पेक्षा अधिक ऍथलिट पात्र ठरले आहेत. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने सर्व फेडरेशन्सना प्रश्नावली पाठवली असून त्यानुसार ऍथलिट, पदाधिकारी यांच्या लसीकरणाबाबत माहिती संकलित केली जाणार आहे. ऍथलिट, पदाधिकाऱयांना पहिली लस कोणती दिली, केव्हा दिली, याबद्दल यात विचारणा केली गेली असून त्यांना दुसरी लस केव्हा द्यावी लागेल, याचा डाटा ठेवला जाणार आहे. खेळाडूंना कोव्हिड प्रोटोकॉलची माहिती दिली गेली आहे का, याची चाचपणी आयओएने या माध्यमातून केली आहे.
ऑलिम्पिकसाठी पात्र असलेल्या काही ऍथलिटसह एकूण 148 जणांना पहिली लस दिली गेली असून 17 जणांचे दुहेरी लसीकरण झाले आहे. 87 पदाधिकाऱयांना लशीची पहिली मात्रा दिली असून 23 जणांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, अशी माहिती आयओएने काही दिवसांपूर्वी दिली होती.