नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधील कांस्यविजेत्या संघातील सदस्य ड्रगफ्लिकर रुपिंदर पाल सिंग व डिफेंडर बिरेंद्र लाक्रा यांनी गुरुवारी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत उभयतांनी आपण यापुढे हॉकी खेळणार नसल्याचे जाहीर केले. युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी आपण हा निर्णय घेतला असल्याचे रुपिंदर म्हणाला तर लाक्रा निवृत्त झाल्याचे वृत्त हॉकी इंडियाने प्रसारित केले.
भविष्यात भारतीय संघात अन्य खेळाडूंना संधी देण्यावर आपला भर असेल. तसेच बेंगळूरमध्ये पुढील आठवडय़ात आयोजित राष्ट्रीय शिबिरासाठी आपला विचार केला जाणार नाही, असे कळवले गेल्यानंतर उभयतांनी सदर निर्णय घेतला असल्याचा दावा सूत्रांनी केला.