ऑलिम्पिक आयोजन समिती-जपानकडून एकमत, 8 ऑगस्ट रोजी सांगता सोहळा,
125 वर्षांच्या इतिहासात प्रथमच ऑलिम्पिक लांबणीवर पडण्याची पहिलीच वेळ
वृत्तसंस्था / टोकियो
एका वर्षाच्या अंतराने लांबणीवर टाकली गेलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी म्हणजे 2021 साली 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा आयोजकांनी सोमवारी केली. पूर्वनियोजित रुपरेषेनुसार ही स्पर्धा यंदा दि. 24 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार होती. मात्र, कोरोनामुळे स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्याचा निर्णय ऑलिम्पिक आयोजन समिती व जपानला एकमताने घ्यावा लागला होता.
यंदाच्या ऑलिम्पिकचा सांगता सोहळा दि. 9 ऑगस्टला होणे अपेक्षित होते. पुढील वर्षी मात्र दि. 8 ऑगस्ट रोजी स्पर्धेची सांगता होईल, असे आयोजन समितीने स्पष्ट केले. जपानमधील कडक उन्हाळा टाळण्यासाठी तेथील वसंत ऋतूत, अर्थात मार्च ते मे या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जावी, असा प्रस्ताव विचाराधीन होता. जपानमध्ये प्रसिद्ध चेरी ब्लॉसम फुलते, तो हा कालावधी आहे. पण, युरोपियन सॉकर व उत्तर अमेरिकन स्पोर्टस् लीग देखील याच कालावधीत होत असल्याने त्याला मूर्त स्वरुप मिळाले नाही.
यापूर्वीचा निर्णय रेटा वाढल्यामुळेच
यंदा स्थानिक आयोजन समिती व आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ऑलिम्पिक स्पर्धेबाबत चार आठवडय़ांच्या कालावधीनंतर निर्णय घेण्याची घोषणा केली होती. पण, ऍथलिटस्, राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना व विविध क्रीडा संघटनांचा रेटा वाढत राहिल्याने आयोजन समितीला यावर तातडीने विचार करणे भाग पाडले. यानंतरच त्यांनी यंदाची स्पर्धा एका वर्षाच्या कालावधीसाठी लांबणीवर टाकत असल्याची घोषणा केली. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात लांबणीवर टाकली गेलेली ही पहिलीच आवृत्ती ठरली आहे. महायुद्धाच्या कालावधीत काही ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या, त्याचा यात अपवाद आहे.
पुनर्रचनेचा खर्च जपान करदात्यांवर!
टोकियो आयोजन समिती अध्यक्ष योशिरो मोरी आणि सीईओ तोशिरो मुतो यांनी ऑलिम्पिक पुनर्रचनेचा खर्च प्रचंड असेल, असे म्हटले असून स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा खर्च जापनीज करदात्यांकडून वसूल केला जाणार आहे.
‘यंदा या उन्हाळय़ात येथे ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती. त्यामुळे, या कालावधीत आम्ही ज्या केंद्रावर स्पर्धा होणे अपेक्षित होते, ते अन्य कोणत्याही कारणासाठी, कोणालाही उपलब्ध करुन दिले नव्हते. त्याशिवाय, आता नव्या तारखा देताना त्याची खात्री आम्हाला द्यावी लागेल. यामुळे, काही भाडय़ाच्या रकमा वाढू शकतात. असे खर्च वाढत जातात. एकंदरीतच ही सारी क्लिष्ट प्रक्रिकया आहे’, असे कन्साय विद्यापीठातील क्रीडा अर्थशास्त्राचे वरिष्ठ प्राध्यापक कात्सुहिरो मियामोतो म्हणाले.
आयोजनासाठी 12.6 अब्ज डॉलर्स
जपान या स्पर्धेच्या आयोजनासाठी 12.6 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा खर्च करणार आहे. त्यात पुनर्रचनेचा 4 अब्ज डॉलर्स खर्चाची भर पडेल, असे संकेत आहेत. स्टेडियम्सची आणखी एक वर्षभर देखभाल, त्यांचे रिफिटिंग, भाडे अदा करणे, दंड भरणे व अन्य खर्चांचा यात प्राधान्याने समावेश आहे.
स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयोजन खर्चासाठी म्हणून नाममात्र 1.3 अब्ज डॉलर्सचा निधी प्रदान करणार असून उर्वरित सर्व खर्च जपानला करावा लागेल. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी टोकियो ऑलिम्पिकसाठी इतिहासात कधी नव्हे इतकी पूर्ण सुसज्ज, तयारी झाली असल्याचा सातत्याने पुनरुच्चार केला होता. पण, उपपंतप्रधान तारो असो यांनी मात्र ही तयारी अतिशय वाईट प्रकारची असल्याची टीका केली होती.
यापूर्वी 1940 मध्येही टोकियोला ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद लाभले. पण, दुसऱया महायुद्धामुळे ती स्पर्धाच रद्द करावी लागली होती. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी जपानसाठी आणखी एक गालबोट यापूर्वीच लागले. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य त्सुनेकाजू ताकेदा यांना गतवर्षी भ्रष्टाचार केल्याप्रकरणी राजीनामा द्यावा लागला आहे. ताकेदा हेच जापनीज ऑलिम्पिक समितीचेही सर्वेसर्वा होते.
ऑलिम्पिक लांबणीवर पडल्याने टोकियोतील हॉटेल्ससमोर यक्षप्रश्न
टोकियो 2020 स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्यानंतर टोकियोतील हॉटेल्ससमोर यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे. आधीच कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने ग्रासले गेल्यानंतर टोकियोतील हॉटेल्स ओस पडली. त्यात ऑलिम्पिक स्पर्धा लांबणीवर टाकली गेल्यानंतर यंदाचे जे मोठय़ा प्रमाणात बुकिंग झाले, ते एकाच वेळी रद्द केले जाईल आणि या परिस्थितीत नव्या बुकिंगवरच भिस्त ठेवावी लागेल. असे झाले तरच हॉटेल्सचे नुकसान टळेल. अर्थात, सध्याच्या परिस्थितीत अशी शक्यता खूपच कमी आहे. कार्यक्रम, मोठय़ा पाटर्य़ांचे बुकिंग किमान सहा महिन्यांपूर्वीच होते. त्यामुळे, ती शक्यताही विरळ आहे. मार्च-एप्रिलमधील जपानमधील हॉटेल बुकिंग चक्क 90 टक्यांनी खाली उतरले आहे, असे जपान टुरिजम एजन्सीच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.