वृत्तसंस्था/ टोकियो
मागील वर्षी जगभरात कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर जपानमध्ये होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आली होती. पण कोरोना प्रकोप अजून चालूच असल्याने यावर्षीही स्पर्धा होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. मात्र आयोजन समिती स्पर्धा घेण्याबाबत ठाम असून स्पर्धा अध्यक्षा सेईको हाशिमोटो यांनी, सुरक्षिततेसाठी प्रेक्षकांशिवाय ही स्पर्धा आयोजित करणार असल्याचे शुक्रवारी सांगितले.
माजी ऑलिम्पियन असलेले हाशिमोटो म्हणाल्या की, स्पर्धेत सहभागी होणारे ऍथलीट्स आणि जपानची जनता यांना आयोजकांनी पूर्ण संरक्षण दिले तरच ही स्पर्धा यशस्वी होईल. तसे झाल्यास नियोजनाप्रमाणे स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल जनतेला आनंदच वाटेल, अशी मला आशा वाटते. विदेशातून येणाऱया प्रेक्षकांना याआधीच प्रवेशबंदी करण्यात आली आहे. स्थानिक प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय मात्र जूनपर्यंत आयोजकांनी जूनपर्यंत लांबणीवर टाकला. जपानमध्येही कोरोनाबाधितांची नवी लाट सुरू झाल्याने त्यांना हा निर्णय घ्यावा लागला आहे. परिस्थिती निर्माण झाली तर एकाही प्रेक्षकाला परवानगी दिली जाणार नाही,’ असेही त्या म्हणाल्या. यापूर्वी ऑलिम्पिक स्पर्धा महायुद्धाचा अपवाद वगळता एकदाही रद्द करण्यात आलेली नाही. त्यामुळे यावेळची स्पर्धा पुन्हा लांबणीवर टाकण्याची किंवा ती रद्दच करण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.