सर्बियातील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची शक्यताही मावळली
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अलीकडेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले 5 मुष्टियोद्धे आगामी राष्ट्रीय पुरुष मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होणार नाहीत, हे मंगळवारी स्पष्ट झाले. सदर पाचही मुष्टियोद्धे याचबरोबर पुढील महिन्यात सर्बियात होणाऱया वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देखील या निर्णयामुळे खेळू शकणार नाहीत, असे चित्र आहे.
अमित पांघल (52 किलोग्रॅम), मनीष कौशिक (63 कि.), विकास कृष्णन (69 कि.), आशिष चौधरी (75 कि.) व सतीश कुमार (91 किलोवरील) यांनी अलीकडेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. सतीशचा अपवाद वगळता अन्य सर्व मुष्टियोद्धे प्राथमिक फेरीतच गारद झाले. सतीशला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचता आले होते.
या मुष्टियोद्धय़ांपैकी विकास, सतीश व आशिष दुखापतीतून सावरत असल्याने ते सहभागी होणार नाहीत. अमित व मनीष हे तंदुरुस्त असले तरी सरावासाठी पुरेसा वेळ उपलब्ध नसल्याने ते सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धा दि. 15 सप्टेंबरपासून कर्नाटकातील बळ्ळारी येथे आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेतील फक्त सुवर्णजेत्यांचाच बेलग्रेड, सर्बिया येथील वर्ल्ड इव्हेंटसाठी विचार केला जाणार असल्याचे भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने जाहीर केले असून यामुळे, हे पाचही ऑलिम्पियन तेथेही खेळू शकणार नसल्याचे सध्याचे चित्र आहे.
ऑलिम्पिकदरम्यान खांद्याची दुखापत झाली असल्याने सतीश यापूर्वीच बाहेर पडला आहे. मागील महिन्यात त्याला शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली होती. यातून सावरण्यासाठी नोव्हेंबरपर्यंत वेळ द्यावा लागेल, असे चित्र आहे. सतीशला देखील ऑलिम्पिक लढतीदरम्यान डोळय़ावर दुखापत झाली आणि यामुळे त्याला इन्फेक्शनचा सामना करावा लागला होता.
विदेशी प्रशिक्षकांना मुदतवाढीची शिफारस
भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने या महिन्यात करार संपुष्टात येत असलेल्या काही विदेशी प्रशिक्षकांना 3 महिने मुदतवाढीची शिफारस केली आहे. सध्या भारतीय मुष्टियुद्धात पुरुष संघासाठी हाय परफॉर्मन्स डायरेक्टर सॅन्तियागो निएव्हा (स्वीडन) व महिला संघासाठी रॅफायले बर्गमॅस्को (इटली) असे दोन प्रशिक्षक कार्यरत आहेत. या उभयतांना 2017 मध्ये करारबद्ध केले गेले आणि त्यांचा करार टोकियो ऑलिम्पिकपर्यंत होता.
यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये 9 भारतीय मुष्टियोद्धे सहभागी झाले. मात्र, त्यापैकी फक्त लोवलिना बोर्गोहेन (69 कि.) हिलाच कांस्य जिंकत पोडियमपर्यंत पोहोचता आले.