यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांकरता भारताकडून अधिकृत एंट्रीत पाठविण्यात आलेला मल्याळी भाषेतील चित्रपट ‘जल्लिकट्टू’ आता याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पहिल्या 5 चित्रपटांसाठी निवडण्यात आलेल्या 15 फिचर फिल्म्समध्ये जल्लिकट्टूला स्थान मिळविता आलेले नाही. ‘जल्लिकट्टू’ला 93 व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फिचर वर्गवारीसाठी भारताकडून पाठविण्यात आले होते.
द अकॅडमी ऑफ मोशन फिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आंतरराष्ट्रीय भाषांमधील 15 चित्रपटांची निवड केली असून यात दिग्दर्शक लिजो जोस पेल्लिसरी यांच्या दिग्दर्शनातील जल्लिकट्टूचा समावेश नाही. निवड झालेल्या चित्रपटांमध्ये रशिया, चेक प्रजासत्ताक, चिली, रोमानिया, बोस्निया आणि हर्जगोविना, फ्रान्स, ग्वाटेमाला, हाँगकाँग, इराण, आयव्हरी कोस्ट, मेक्सिको, तैवान आणि टय़ुनिशियाचे चित्रपट सामील आहेत.
इंटरनॅशनल फिचर फिल्मच्या शेणीत एकूण 93 चित्रपट होते. अकॅडमीच्या सर्व सदस्यांनी मतदान करून 15 चित्रपटांची निवड केली आहे. ऑस्कर्ससाठी अंतिम नामांकनांची घोषणा 15 मार्च रोजी करण्यात येणार आहे.