वृत्तसंस्था/ स्पीलबर्ग बेई निटलफेल्ड
रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनने येथे झालेल्या ऑस्ट्रियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीचे जेतेपद पटकावत वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मर्सिडीजच्या हॅमिल्टनवर मोठी आघाडी घेतली आहे. या शर्यतीत चौथे स्थान मिळालेल्या हॅमिल्टनचा संघसहकारी व्हाल्टेरी बोटासने दुसरे तर मॅक्लारेनच्या लँड्रो नॉरिसने तिसरे स्थान मिळविले. व्हर्स्टापेनचे हे सलग तिसरे विजेतेपद आहे.
व्हर्स्टापेनने ही शर्यत पोल पोझिशनवरून सुरू केली होती. सलग तिसरी शर्यत जिंकत त्याने हॅमिल्टनची ड्रायव्हर्स टायटलवरील पकड ढिली केली असून आठव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकण्याच्या त्याच्या आशेला त्याने धक्का दिला आहे. या शर्यतीसाठी दीर्घ काळानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. सुमारे एक लाख शौकिनांनी या शर्यतीला हजेरी लावली होती. व्हर्स्टापेनच्या विजयानंतर डच शौकिनांनी मोठा जल्लोष करीत आनंद साजरा केला. ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये आता व्हर्स्टापेनचे 182 गुण झाले असून हॅमिल्टन त्याच्यापेक्षा 32 गुणांनी मागे आहे. आता ब्रिटिश ग्रां प्रि शर्यत 18 जुलै रोजी सिल्व्हरस्टोन येथे होणार आहे.