वृत्तसंस्था/ पॅरिस
कपात केलेल्या फॉर्म्युला वन मोसमाची सुरुवात पुढील महिन्यात करण्यात येणार असून ऑस्ट्रियात 5 व 12 जुलै रोजी होणाऱया दोन शर्यती प्रेक्षकांविना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर युरोपमधील इतर सहा ग्रां प्रि शर्यती होणार असल्याचे आयोजकांनी मंगळवारी सांगितले.
या मोसमात 15 ते 18 शर्यती होतील, अशी आशा फॉर्म्युला वनने केली असून या शर्यती डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. मार्चमध्ये ऑस्ट्रेलियातील ग्रां प्रि शर्यतीने एफ वन मोसामाची सुरुवात केली जाते. पण यावेळी कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे या शर्यतीसाठी सराव सुरू होण्याच्या काही तास आधी ती रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. कोव्हिड 19 महामारीविरुद्धच्या लढय़ासाठी तयार केलेला नवीन परिपूर्ण व व्यावसायिक आराखडा सादर केल्यानंतर गेल्या आठवडय़ात ऑस्ट्रियन सरकारने जुलैमधील डबल हेडर शर्यतींना मंजुरी दिली असल्याने या मोसमाची सुरुवात होणार आहे.
आता हंगेरीयन ग्रां प्रि थोडी पुढे घेण्यात आली असून ती आता 19 जुलै रोजी होईल. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, इटली, बेल्जियममधील शर्यती होतील. या सर्व शर्यती प्रेक्षकांशिवाय घेण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांनाही आरोग्यविषयक नियमावली कटाक्षाने पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. ‘सध्या चाहत्यांना या शर्यतीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. पण परिस्थितीत सुधारणा झाल्यास त्यांचे पुन्हा स्वागत करण्यात येईल,’ असे एफ वनचे प्रमुख चेस कॅरे म्हणाले. मात्र फॉर्म्युला वनचे पुनरागमन हे क्रीडा जगताला निश्चितच संजीवनी देणारे ठरेल, असेही ते म्हणाले.
2 व 9 ऑगस्ट रोजी ब्रिटिश ग्रां प्रि शर्यती सिल्व्हरस्टोन येथे होतील, त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी स्पॅनिश ग्रां प्रि बार्सिलोनात होईल. बेल्जियम व इटालियन ग्रां प्रि शर्यती आधी ठरलेल्या 30 ऑगस्ट व 6 सप्टेंबर या तारखांनाच होतील. या शर्यतीनंतर युरोपमधील एफ वनचा टप्पा पूर्ण होईल. सुधारित वेळापत्रकानुसार यानंतर आशिया, अमेरिका येथील शर्यती सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होतील आणि गल्फमध्ये बहरिन व अबु धाबी शर्यतीने डिसेंबरमध्ये एफ वन मोसमाची सांगता होईल. या वर्षी एकूण 22 शर्यती आयोजित करण्याचे ठरले होते. पण आता ती 2009 नंतर आजवरची सर्वात छोटी मोहिम ठरली आहे. यावेळी ऑस्ट्रेलिया, मोनॅको, फ्रान्स, नेदरलँड्स येथील शर्यती रद्द करण्यात आल्या आहेत.