मेलबर्न : कोरोना निर्मूलनासाठी नियमावलीमुळे पुढील वर्षी जानेवारीत होणारी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा उशिराने म्हणजे 8 फेब्रुवारीपासून घेतली जाणार असल्याचे वृत्त एका दैनिकाने दिले आहे. खेळाडूंचे आगमन व क्वारंटाईन याबाबतची बोलणी अद्याप सुरू असल्याचेही त्यात म्हटले आहे.
क्हिक्टोरिया राज्य सरकारने 15 ते 17 जानेवारीपासून या स्पर्धेसाठी दाखल होण्यास आंतरराष्ट्रीय खेळाडूंना परवानगी दिली आहे, असे फ्रान्सचे क्रीडा दैनिक अल’एक्विपने वृत्त दिले आहे. म्हणजे वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा तीन आठवडे उशिरान सुरू होणार आहे. या प्रस्तावानुसार खेळाडूंना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्येही सराव करता येणार आहे. टेनिस ऑस्ट्रेलियाने बुधवारी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. पण 18-31 जानेवारी दरम्यान होणाऱया स्पर्धेचा तपशील लवकरच जाहीर करणार असल्याचे टेनिस ऑस्ट्रेलियाचे सीईओ क्रेग टिली यांनी मंगळवारी सांगितले होते. ‘या स्पर्धेच्या वेळापत्रकाला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्याबद्दल आम्ही लवकरच घोषणा करणार आहोत,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व बाबी निश्चित होण्याआधी क्हिक्टोरिया सरकारकडून त्याला मंजुरी व करार होण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
टिली यांना, सर्व खेळाडू डिसेंबरच्या मध्यावर या स्पर्धेसाठी दाखल व्हावे आणि क्वारंटाईनमध्ये राहिल्यानंतर त्यांना मुख्य स्पर्धेआधी होणाऱया वार्मअप स्पर्धांत सहभागी होता यावे, असे वाटत होते. पण व्हिक्टोरियाचे प्रमुख डॅन अँड्रय़ूज यांनी खेळाडूंना जानेवारीच्या सुरुवातीस आणण्याचा आग्रह धरल्यामुळे स्पर्धेआधीच्या सराव इव्हेंटमध्ये त्यांना सहभागी होता येणे अशक्य बनले आहे.
‘स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडावी अशीच आमचीही इच्छा आहे. पण राज्यातील आरोग्य व सुरक्षितता हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कोव्हिड 19 च्या दुसऱया लाटेनंतर झालेल्या लॉकडाऊनमधून आपले राज्य नुकतेच बाहेर आले असल्याने ही काळजी घेणे अत्यावश्यक आहे,’ अशा शब्दांत अँड्रय़ूज यांनी बुधवारी आपली भूमिका स्पष्ट केली. 8 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरू करण्याचे निश्चित झाल्यास खेळाडूंना त्याआधी क्वारंटाईननंतर एकाच सराव स्पर्धेत भाग घेता येणार आहे.