वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियन क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान देणारी ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार तसेच भारतीय वंशाची लिसा स्थळेकर हिचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला. शुक्रवारी त्यांनी या निर्णयाची घोषणा केली.
लिसाचा जन्म पुण्यामध्ये झाल्यानंतर तिचे कुटुंबीय ऑस्ट्रेलियात स्थायिक झाले. 2001 ते 2013 या बारा वर्षांच्या कालावधीत लिसा स्थळेकरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत आठ कसोटी, 125 वन डे आणि 54 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना जवळपास 4 हजार धावा जमविल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघामध्ये लिसा स्थळेकर ही महत्त्वाची अष्टपैलू म्हणून गाजली. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट क्षेत्रात लिसा स्थळेकरला महत्त्वाचे स्थान दिले जाते.
क्रिकेटच्या विविध प्रकारामध्ये ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आयसीसीच्या चार विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकल्या असून लिसाचा ऑस्ट्रेलियन विजेत्या महिला संघामध्ये समावेश होता. 2006 साली न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व लिसाकडे सोपविण्यात आले होते. 2007 साली लिसाची आयसीसीतर्फे सर्वोत्तम महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच तिला बेलिंडा क्लार्क पदक देऊन गौरविण्यात आले होते. 2007, 2008 साली लिसाची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली होती. 2020 ऑगस्टमध्ये आयसीसीच्या क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये लिसा स्थळेकरचा समावेश करण्यात आला होता. आयसीसीतर्फे असा बहुमान मिळविणारी लिसा ही 27 वी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे.
ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये आतापर्यंत क्रिकेट क्षेत्रात भरीव योगदान देणाऱया क्रिकेटपटूंच्या तैलचित्राचा समावेश करून गौरव केला जातो. ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेटपटू बेलिंडा क्लार्क, कॅरेन रोल्टन आणि मिलेनी जोन्स यांचाही समावेश आहे. आता लिसा स्थळेकर ही ऑस्ट्रेलियाची चौथी महिला क्रिकेटपटू आहे.
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत चार वेळा आयसीसीच्या विश्वचषक पटकावला असून प्रत्येक वेळी ऑस्ट्रेलियन संघात लिसा स्थळेकरचा समावेश होता. काही वैयक्तिक समस्यांमुळे लिसाने 2013 साली मुंबईत झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर क्रिकेट क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता.