वृत्तसंस्था/ मेलबर्न
येथे 17 जानेवारीपासून 2022 सालातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासात महिलांच्या विभागातील स्पर्धेला 100 वर्षे पूर्ण झाल्याने यावेळी महिलांच्या सामन्यांच्या कार्यक्रमांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय स्पर्धा आयोजकांनी घेतला आहे. आता महिलांच्या विभागातील उपांत्य सामने रात्रीच्या सत्रामध्ये खेळविले जाणार आहेत.
महिला एकेरीचे उपांत्य फेरीतील दोन्ही सामने रात्रीच्या सत्रामध्ये खेळविले जाणार असून टेनिस शौकिनांना ही पर्वणीच ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाची टॉप सिडेड महिला टेनिसपटू ऍश्ले बार्टी यावेळी या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल. गेल्या 44 वर्षांच्या कालावधीत या स्पर्धेत ऑस्ट्रेलियन स्थानिक महिला टेनिसपटूला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यावेळी जपानची विद्यमान विजेती नाओमी ओसाका आणि ऑस्ट्रेलियाची बार्टी यांच्यात जेतेपदासाठी प्रमुख चुरस राहिल.
स्पेनचा नदाल आणि सर्बियाचा जोकोविच यांनी आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत प्रत्येकी 20 एकेरीची ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. या स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधीत्व करतील. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण सोनी-6 (इंग्रजी), सोनी टेन -2 (इंग्रजी), सोनी टेन -3 (हिंदी), सोनी टेन-4 (इंग्रजी) या वाहिनीवर उपलब्ध राहिल.