वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2021 च्या टेनिस हंगामातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेला येथे 8 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. कोरोना समस्येमुळे ऑस्ट्रेलियात खबरदारीचे कडक उपाय अमलात आणले जात असल्याने या स्पर्धेसाठी दाखल होणाऱया विविध देशांच्या टेनिसपटूंना क्वारंटाईनची व्यवस्था स्पर्धा आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. महिला टेनिसपटू व्हिक्टोरिया अझारेन्काचे येथे आगमन झाले असून तिलाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे.
या स्पर्धेत कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचा निर्णय घेतल्याने विदेशातून येणाऱया टेनिसपटू आणि त्यांच्या प्रशिक्षक वर्गाला क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. बेलारुसच्या अझारेन्काने 2012 आणि 2013 साली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. शुक्रवारी तिचे ऑस्ट्रेलियात आगमन झाले. आता ती आपल्या सरावावर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वीसचा टेनिसपटू वावरिंका तसेच अन्य देशांच्या दोन टेनिसपटूंचे चार्टर विमानाने ऑस्ट्रेलियात आगमन झाले. या सर्व टेनिसपटूंना मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. महिला टेनिसपटू स्वीटोलिनाने आपल्या ट्विटरवर मास्कचा वापर केलेला चेहरा प्रसिद्ध केला आहे. या स्पर्धेसाठी सुमारे 1200 टेनिसपटू, प्रशिक्षक आणि इतर अधिकारी दाखल होत आहेत. प्रत्येक वषी ही स्पर्धा जानेवारीत खेळविली जाते. पण यावेळी कोरोना समस्येमुळे ती 8 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता.