वृत्तसंस्था/ मेलबर्न
स्वीसचा 39 वर्षीय अनुभवी आणि 21 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविणारा टेनिसपटू रॉजर फेडररने 8 फेब्रुवारीपासून येथे सुरू होणाऱया नव्या वर्षांतील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेतून गुडघा दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये फेडररचा मोठा चाहतावर्ग मोठय़ा प्रमाणात असल्याने त्यांची फेडररच्या या निर्णायामुळे निराशा झाली आहे. 2000 साली फेडररने या स्पर्धेत आपले पदार्पण केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला या स्पर्धेला मुकावे लागत आहे. फेडररने आतापर्यंत सहावेळा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात फेडररला सर्बियाच्या जोकोव्हिचकडून हार पत्करावी लागली होती. फेडररचा हा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर कोरोना महामारीच्या उद्रेकामुळे फेडररला टेनिसपासून अलिप्त रहावे लागले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात फेडररच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
अमेरिकेची माजी टॉप सीडेड महिला टेनिसपटू 39 वर्षीय सेरेना विल्यम्सने या स्पर्धेत आपला सहभाग निश्चित केला आहे. तिने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत 23 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. माजी महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्टचा 24 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याकरिता सेरेनाला आणखी एका जेतेपदाची गरज आहे. ब्रिटनच्या अँडी मरेला यावेळी या स्पर्धेत वाईल्डकार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार पुन्हा ऑस्ट्रेलियात वाढत असल्याने ही स्पर्धा 8 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱया सर्व टेनिसपटूंना आगमनानंतर 14 दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये रहावे लागणार आहे. या स्पर्धेच्या पुरूष आणि महिला विभागातील पात्र फेरीची स्पर्धा अनुक्रमे दोहा आणि दुबई येथे 10 ते 13 जानेवारी दरम्यान घेतली जाणार आहे.