वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2021 साली होणाऱया ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेवेळी कोरोना परिस्थितीमुळे जनतेच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाणार असून या स्पर्धेतील सामन्यावेळी शौकिनांच्या उपस्थितीवर निर्बंध घालण्याची योजना आखली जात आहे.
कोरोना महामारी संकटाने अनेक देशांची परिस्थिती बिकट झाली आहे. टेनिस ऑस्ट्रेलियाने पुढीलवर्षी होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेवेळी सुरक्षा योजनेवर अधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रमुख कार्यकारी क्रेम टीले यांनी सांगितले. 2020 सालातील विंबल्डन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा कोरोना परिस्थितीमुळे रद्द करण्यात आली तर प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली असून आता ही स्पर्धा येत्या सप्टेंबर महिन्यात घेतली जाणार आहे. पुढीलवर्षीच्या प्रारंभी होणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेसाठी स्पर्धा आयोजकांनी शौकिन आणि टेनिसपटूंसाठी सुरक्षा आराखडा तयार केला आहे. स्पर्धेतील सामन्यावेळी शौकिनांच्या संख्येवर निर्बंध घालण्याचा विचार चालू आहे. दरम्यान कोरोना परिस्थितीमध्ये निश्चित सुधारणा आणखी काही दिवसानंतर पाहावयास मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.