वृत्तसंस्था/ सिडनी
कोरोना महामारी समस्येमुळे भारतातील आयपीएल क्रिकेट स्पर्धा अर्धवट स्थितीमध्ये बेमुदत तहकूब करण्यात आली. दरम्यान या स्पर्धेत खेळणाऱया ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी दोन आठवडय़ांचा कालावधी लागला. सोमवारी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे पथक मालदीव येथून सिडनीत दाखल झाले.
आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकात ऑस्ट्रेलियन खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक असे एकूण 38 जणांचा समावेश होता. भारतात कोरोनाच्या दुसऱया लाटेने परिस्थिती बिकट बनविल्याने ऑस्ट्रेलियन शासनाने भारतातून होणाऱया हवाई प्रवासावर निर्बंध घातले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या या पथकाला बीसीसीआयतर्फे चार्टर फ्लाईटने मालदीवला नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ऑस्ट्रेलियन पथकाला 10 दिवस मालदीवमध्ये वास्तव्य करावे लागले होते. ऑस्ट्रेलियाच्या या पथकातील सर्व सदस्यांना दोन आठवडय़ांच्या कालावधीकरिता सिडनीतील एका हॉटेलात क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.