कांगारुंना आघाडी फळीतील फलंदाजांच्या फॉर्मची चिंता, विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी लंका महत्त्वाकांक्षी
दुबई / वृत्तसंस्था
माजी चॅम्पियन्स श्रीलंकन संघ आज (गुरुवार दि. 28) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱया आयसीसी टी-20 विश्वचषक साखळी सामन्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या खराब फॉर्मचा लाभ घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. सुपर-12 फेरीत पहिल्या गटात विजयी घोडदौड कायम राखण्याचा त्यांचा आज प्रयत्न असेल. ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
2014 मध्ये या स्पर्धेत विजेते ठरलेल्या लंकेने यंदाही बांगलादेशचा 5 गडी राखून धुव्वा उडवत उत्तम सुरुवात केली. दुसरीकडे, आजवर आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकू न शकलेल्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रतिकूल स्थितीतून जावे लागल्यानंतरही विजय खेचून आणला. 118 धावांच्या किरकोळ आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची एकवेळ 3 बाद 38 अशी दैना उडाली होती. मात्र, नंतर त्यांनी विजय संपादन केला होता.
त्या लढतीत कर्णधार ऍरॉन फिंच शून्यावर बाद झाला तर खराब फॉर्ममधील डेव्हिड वॉर्नरला पुन्हा एकदा झगडावे लागले होते. मिशेल मार्श देखील आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारण्यापासून कित्येक कोस दूर राहिला. या निकषावर कांगारुंना दुरुस्ती करावी लागणार आहे.
लंकेविरुद्ध वर्चस्व गाजवण्यासाठी फिंच व वॉर्नर या ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील पॉवरहाऊसेसना अनुभव पणाला लावावा लागेल, हे देखील साहजिक आहे. स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डाव सावरण्यात मोलाचा वाटा उचलला होता. या लढतीतही त्याला संघाच्या आवश्यकतेनुरुप खेळ साकारावा लागेल. मार्शने पॉवरहिटिंग करणे देखील ऑस्ट्रेलियासाठी आवश्यक ठरु शकेत. अर्थात, युएईतील संथगती गोलंदाजीला पोषक वातावरणात लंकन फिरकीपटूंना ताकदीने सामोरे जाणे त्यांच्यासाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे.
यापूर्वी, बांगलादेशविरुद्ध विजयी संघात समाविष्ट नसलेला महिश तिक्षणा येथे पुनरागमन करत असल्याने लंकेची ही जमेची बाजू असेल. लेगस्पिनिंग अष्टपैलू वणिंदू हसरंगा पुन्हा एकदा भेदक मारा साकारण्याची लंकेला अपेक्षा असणार आहे. आयपीएल चॅम्पियन्स चेन्नई सुपरकिंग्सतर्फे भेदक मारा साकारणाऱया हॅझलवूडसह मिशेल स्टार्क व पॅट कमिन्सला सामोरे जाणे लंकेसाठी अर्थातच आव्हानात्मक असेल. लंकन फलंदाजीत फारसे सातत्य नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, प्रारंभीच एखादा झटका बसला तर यातून सावरण्यासाठी त्यांना बरेच प्रयास करावे लागू शकतात.
सलामीवीर कुशल परेरा उत्तम योगदान देण्याची क्षमता राखून असेल. मात्र, हॅझलवूड अँड कंपनीला सूर सापडला तर त्याची कसोटी लागणे साहजिक असणार आहे. कर्णधार दसून शनाकाला युवा चरिथ असलंका, सलामीवीर पथूम निसांका, अविष्का फर्नांडो यांच्याकडून या लढतीतही बऱयाच अपेक्षा असतील.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), ऍस्टॉन ऍगर, पॅट कमिन्स (उपकर्णधार), जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा.
श्रीलंका ः दसून शनाका (कर्णधार), कुशल जनिथ परेरा, दिनेश चंडिमल, धनंजया डीसिल्वा, पथूम निसांका, चरिथ असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्ष, चमिका करुणारत्ने, वणिंदू हसरंगा, दुष्मंता चमीरा, लहिरु कुमारा, महिश तिक्षणा, अकिला धनंजया, बिनुरा फर्नांडो.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
अव्वल प्रतिस्पर्ध्यांमुळे पहिला गट ठरतो आहे ‘ग्रूप ऑफ डेथ’!
यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी 12 संघ 2 गटात विभागले गेले असून साखळी फेरीअखेर दोन्ही गटातील 2 अव्वल संघ थेट सेमीफायनलसाठी पात्र असणार आहेत. दुसऱया गटात उपांत्य फेरीसाठी प्रामुख्याने पाकिस्तान, न्यूझीलंड व भारत या संघात मुख्य चुरस रंगू शकते. या गटात अफगाण, नामिबिया, स्कॉटलंड हे संघ धक्का देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत.
पहिल्या गटात मात्र इंग्लंड, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश व विंडीज असे एकापेक्षा एक तगडे संघ असून यातील केवळ दोनच संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. याचमुळे हा पहिला गट स्पर्धेतील ग्रूप ऑफ डेथ म्हणून ओळखला जातो आहे.