मेलबर्न / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेडला कोरोनाची बाधा झाली असून यामुळे तो सिडनी येथे होणाऱया चौथ्या ऍशेस कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला. रुटीन आरटीपीसीआर टेस्टमध्ये हेडला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या दोन्ही संघातील सर्व खेळाडू, त्यांचे कुटुंबीय व सहायक पथकातील सदस्यांची रोज चाचणी केली जात असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने यावेळी नमूद केले. ट्रव्हिस हेड खेळू शकणार नसल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिशेल मार्श, निक मॅडिसन व जोश इंग्लिस यांना राखीव खेळाडू म्हणून पाचारण केले आहे.
यापूर्वी गुरुवारी इंग्लिश प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवूड हे देखील सिडनी कसोटीला हजर राहू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले. सिल्व्हरवूड यांच्या थेट संपर्कातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे त्यावेळी निदर्शनास आले होते. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याने त्यांची जागा आता स्टीव्ह बर्नार्ड घेणार असल्याचे यापूर्वी जाहीर केले गेले आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत यापूर्वीच 3-0 असा विजय संपादन केला असून उभय संघातील चौथी कसोटी दि. 5 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे.