अंतिम लढतीत इंग्लंडवर 71 धावांनी मात, इंग्लंडचे जेतेपदाचे स्वप्न हुकले, स्कीव्हरची शतकी खेळी व्यर्थ
ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वविजेता
ऑस्ट्रेलिया महिला संघाने इंग्लंडला पराभूत करत विश्वचषकावर सातव्यांदा आपले नाव कोरले. विशेष म्हणजे आतापर्यंत 12 वेळा महिला विश्वचषक खेळवण्यात आला आहे. यातील सातवेळा तर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व दिसले आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाने 1978, 1982, 1988, 1997, 2005, 2013 आणि 2022 या वर्षी जेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियानंतर चार वेळा इंग्लंड महिला संघाने वर्ल्डकप जिंकला आहे. इंग्लंड महिला संघाने 1973, 1993, 2009 आणि 2017 या चार वर्षी विश्वचषक जिंकला. या यादीत न्यूझीलंड तिसऱया स्थानी आहे. न्यूझीलंडने 2000 साली आपल्याच मायदेशात विश्वचषक जिंकला. आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड या तीन संघांनाच महिला विश्वचषक जिंकता आलेला आहे. भारताने दोनदा अंतिम फेरी गाठली, पण दोन्ही वेळेस उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
सामनावीर, मालिकावीर ठरलेल्याऍलिसा हिलीची विक्रमाला गवसणी
इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात ऍलिसा हिलीने 170 धावा फटकावल्या. ही महिला वनडे विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक खेळी ठरली. हिलीपूर्वी ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटपटू कॅरेन रॉल्टन हिच्या नावे हा पराक्रम होता. तिने 2005 मध्ये भारताविरुद्ध अंतिम सामन्यात नाबाद 107 धावा फटकावल्या होत्या. मात्र आता हिलीने तिचा विक्रम मोडित काढला आहे.
महिला विश्वचषक अंतिम सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
170 ा ऍलिसा हिली विरुद्ध इंग्लंड, 2022
107 ा कॅरेन रोल्टन विरुद्ध भारत 2005
91 ा बेलिंडा क्लार्क विरुद्ध न्यूझीलंड, 2000
एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावांचा हिलीचा विक्रम
ऍलिसा हिलीने एकाच महिला विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा तिची सहकारी रॅशेल हेन्सचा विक्रम मोडला आहे. रॅशेलने यंदाच्या वर्षी विश्वचषकामध्ये 497 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला होता. एकाच विश्वचषकात 500 हून अधिक धावा करणारी ऍलिसा हिली ही पहिली महिला खेळाडू ठरली आहे.
महिला विश्वचषकात सर्वाधिक धावा
509 धावा, ऍलिसा हिली 2022
497 धावा, रॅचेल हेन्स 2022
456 धावा, डेबी हॉकले 1997.