वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
ऑस्टेलियन महिला संघाने न्यूझीलंड महिलांचा तब्बल 232 धावांनी दणदणीत पराभव करून सलग 21 वनडे सामने जिंकण्याच्या पाँटिंगच्या संघाने 2003 मध्ये केलेल्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आणि तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली.
कर्णधार मेग लॅनिंग दुखापतीमुळे या तिसऱया सामन्यात खेळू शकली नाही तर अष्टपैलू एलीस पेरी याच कारणास्तव या मालिकेतच खेळू शकली नाही. तरीही या संघाने न्यूझीलंडवरील आजवरचा सर्वात मोठा विजय मिळविण्याचा पराक्रम केला. पाँटिंगच्या संघाने केलेला विश्वविक्रम त्यांना मागे टाकता येऊ शकतो. पण त्याबाबत थोडी साशंकता निर्माण झाली आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱयावर येणार आहे. पण महामारीमुळे हा दौरा होऊ शकेल का, अशी शंका निर्माण झाली आहे. याशिवाय ऑस्ट्रेलिया संघाचा न्यूझीलंड दौराही प्रवासाच्या निर्बंधामुळे अडचणीत आला आहे.
महिला संघाची विजयी घोडदौड मार्च 2018 पासून भारतावरील विजयाने सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तान, इंग्लंड, विंडीज लंका, न्यूझीलंड यांच्याविरुद्धच्या मालिका जिंकल्या. येथील तिसऱया सामन्यात ऑस्ट्रेलियन महिलांनी 50 षटकांत 5 बाद 325 धावांचा डोंगर उभारला. हंगामी कर्णधार रॅचेल हेन्सने 96 धावा करताना ऍलीसा हिलीसमवेत 144 धावांची सलामी दिली. हिलीने 87 धावा फटकावल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 27 षटकांत केवळ 93 धावांत गुंडाळून त्यांनी मोठा विजय साकार केला. ऍमी सॅथर्टवेट (41) व मॅडी ग्रीन (22) या दोघींनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.