पहिल्या वनडेत भारतावर 9 गडय़ांनी विजय, ब्राऊनचे 4 बळी, हेन्स, ऍलीसा, लॅनिंग यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/ मॅके
बलाढय़ ऑस्ट्रेलियाने विजयी घोडदौड कायम ठेवताना येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय महिलांवर 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळविला. त्यांचा हा सलग 25 वा विजय आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत त्यांनी 1-0 अशी आघाडी घेतली आहे. 33 धावांत 4 बळी टिपणाऱया ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राऊनला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळाला. रॅशेल हेन्स, ऍलीसा हीली, मेग लॅनिंग या तिघींनीही अर्धशतके नोंदवली. याच ठिकाणी शुक्रवारी 24 रोजी डे-नाईट सामना होणार आहे.
प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने 50 षटकांत 8 बाद 225 धावा जमविल्या. त्यात कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकाचा समावेश होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलांनी भारताच्या निष्प्रभ गोलंदाजीचा लाभ घेत 41 षटकांत विजयी लक्ष्य गाठताना केवळ एक गडी गमविला. सलामीवीर हेन्स व ऍलीसा हीली यांनी 126 धावांची सलामी देत यजमानांना भक्कम सुरुवात करून दिली. त्यानंतर कर्णधार लॅनिंगने हेन्ससमवेत अभेद्य शतकी भागीदारी करीत विजय साकार केला. हीलीने 77 चेंडूत 77, हेन्सने 100 चेंडूत नाबाद 93 व लॅनिंगने 69 चेंडूत नाबाद 53 धावा काढल्या.
भारताच्या डावात कर्णधार मितालीने सलग पाचवे अर्धशतक नोंदवताना 107 चेंडूत 63 धावा जमविल्या. तिचे हे कारकिर्दीतील 59 वे अर्धशतक होते. याशिवाय पदार्पणवीर यास्तिका भाटिया (51 चेंडूत 35), रिचा घोष (29 चेंडूत नाबाद 32) व वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (24 चेंडूत 20) यांनीही उपयुक्त योगदान दिले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 41 षटकांतच 1 बाद 227 धावा जमवित सलग 25 वा विजय साकार केला. चार वेळा विश्वचषक जिंकणाऱया ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबर 2017 मध्ये शेवटचा सामना गमविला होता. झुलन गोस्वामी व रिचा घोष यांनी आठव्या गडय़ासाठी 45 धावांची भागीदारी केल्यामुळेच भारताला दोनशे मजल पार करता आली. दरवेळी शफाली वर्मा (8) व स्मृती मानधना (16) भारताला दमदार सुरुवात करून देतात. पण यावेळी त्या अपयशी ठरल्यानंतर मिताली, यास्तिका व रिचा यांच्याशिवाय इतरांना मोठे योगदान देता आले नाही. ब्राऊन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. तिने 4 बळी मिळविले तर पदार्पण करणाऱया हन्नाह डार्लिंग्टनने 2 व सोफी मोलिनने 2 बळी मिळविले. मितालीला एक चेंडू हेल्मेटला लागला होता. पण तिने माघारी न जाता खेळ पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
सावध सुरुवात करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या 8 षटकांत 30 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर हीली व हेन्स यांनी धावांची गती वाढवत नेली आणि दोघींनी 126 धावांची भागीदारी केली. हीलीची फलंदाजी जास्त आक्रमक होती. तिने आपल्या खेळीत 8 चौकार व 2 षटकार मारले. लेगस्पिनर पूनम यादवला उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात ती मिडऑफवर झेलबाद झाली. हेन्सने लॅनिंगच्या साथीने आणखी पडझड होऊ न देता विजयाचे उद्दिष्ट पूर्ण केले.
या सामन्यात भारताने तिघींना पदार्पणाची संधी दिली तर अंतिम अकरामध्ये स्नेह राणा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार या तीन अष्टपैलूंना स्थान देताना स्पेशालिस्ट डावखुऱया स्पिनरला संघाबाहेर ठेवले. पण हा डाव फारसा उपयोगी ठरला नाही. मेघना सिंगने चेंडू स्विंग करण्याच्या कौशल्याने प्रभावी मारा केला तर अनुभवी झुलन गोस्वामीने नेहमीप्रमाणे अचूक मारा केला. मात्र भारताची एकही गोलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर दडपण आणू शकली नाही.
संक्षिप्त धावफलक ः भारतीय महिला 50 षटकांत 8 बाद 225 ः शफाली वर्मा 8, स्मृती मानधना 16, यास्तिका भाटिया 35, मिताली राज 63, दीप्ती शर्मा 9, पूजा वस्त्रकार 17, रिचा घोष 29 चेंडूत नाबाद 32, स्नेह राणा 2, झुलन गोस्वामी 20, मेघना सिंग नाबाद 1, अवांतर 22. गोलंदाजी ः डार्सी ब्राऊन 4-33, सोफी मोलिन 2-39, डार्लिंग्टन 2-29, गार्डनर 0-14.
ऑस्ट्रेलियन महिला 41 षटकांत 1 बाद 227 ः रॅशेल हेन्स नाबाद 93 (100 चेंडूत 7 चौकार), ऍलीसा हीली 77 (77 चेंडूत 8 चौकार, 2 षटकार), मेग लॅनिंग नाबाद 53 (69 चेंडूत 7 चौकार), अवांतर 4. गोलंदाजी ः पूनम यादव 1-58, स्नेह राणा 0-46, गोस्वामी 0-38, मेघना सिंग 0-27, पूजा वस्त्रकार 0-26 (2 षटके), दीप्ती शर्मा 0-31).