पहिल्या उपांत्य लढतीत विंडीजला 157 धावांनी नमवले
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाने विंडीज संघाचा 157 धावांनी एकतर्फी धुव्वा उडवत आयसीसी महिला वनडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. ऍलिसा हिली (129) व रॅशेल हेन्स (85) यांनी 216 धावांची सलामी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 45 षटकात 3 बाद 305 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात विंडीजचा डाव 37 षटकात 148 धावांमध्येच खुर्दा झाला. पावसाचा व्यत्यय आल्याने ही लढत 45 षटकांची निर्धारित केली गेली.
विंडीजने नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. पण, हा निर्णय त्यांच्यावरच उलटल्याचे लवकरच अधोरेखित झाले. यष्टीरक्षक-फलंदाज ऍलिसा हिलीने 107 चेंडूत 17 चौकार व एका षटकारासह 129 धावांची आतषबाजी केली तर सहकारी सलामीवीर रॅशेल हेन्सने 100 चेंडूत 9 चौकारांसह 85 धावा वसूल केल्या. या जोडीने 32.4 षटकातच 216 धावांची तडाखेबंद द्विशतकी सलामी दिली.
तिसऱया स्थानावरील ऍश्ले गार्डनर 12 धावांवर बाद झाली. मात्र, त्यानंतर कर्णधार मेग लॅनिंग (26 चेंडूत 26) व बेथ मुनी (31 चेंडूत 3 चौकारांसह 43) यांनी चौथ्या गडय़ासाठी 69 धावांची बरसात करत संघाला सहजपणे 300 धावांचा टप्पा सर करुन दिला.
विजयासाठी 306 धावांचे कडवे आव्हान असताना विंडीजचा संघ एकदाही विजयपथावर दिसून आला नाही. कर्णधार स्टेफानी टेलरने सर्वाधिक 48 धावांचे योगदान दिले. याशिवाय, डॉटिन व मॅथ्यूज यांनी प्रत्येकी 34 धावा केल्या. त्यांचे अन्य सहकारी मात्र अजिबात तग धरु शकले नाहीत. दोन्ही संघातील दर्जात असलेले जमीन-अस्मानाचे अंतर यावेळी सुस्पष्ट झाले. रॅशदा विल्यम्स 10 चेंडू खेळूनही खाते न उघडताच बाद झाली. हिली मॅथ्यूजला बाद करत जेस जोनासनने फिरकीतील पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर विंडीजचा डाव सातत्याने घसरत राहिला आणि त्यांना 37 षटकात सर्वबाद 148 धावांवर समाधान मानावे लागले.
लढतीत पावसाचा व्यत्यय
पावसाचा व्यत्यय आल्याने ही लढत 45 मिनिटे उशिराने सुरु झाली आणि एकूण 10 षटकांची कपात करणे भाग होते. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी बेसिन रिझर्व्हवरील या लढतीत पॉवर प्लेमध्ये 37 धावा वसूल केल्या. हिलीने जम बसवण्यासाठी जरुर वेळ घेतला. पहिल्या 25 चेंडूत तिने केवळ 10 धावा केल्या. मात्र, त्यानंतर पहिले अर्धशतक 63 चेंडूत पूर्ण केल्यानंतर पुढील अर्धशतक अवघ्या 28 चेंडूत झळकावत तिने वर्ल्डकपमधील आपले पहिले शतक नोंदवले.
हिली नंतर दुखापतग्रस्त अनिसा मोहम्मदच्या जागी क्षेत्ररक्षणास उतरलेल्या शकेरा सेलमनकडे झेल देत तंबूत परतली. चिनेले हेन्रीने एकाच षटकात दोन गडी बाद करत सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. पण, तोवर हिली व हेन्स यांनी आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडली होती.
एरवी सातव्या स्थानी फलंदाजीला उतरणाऱया ऍश्ले गार्डनरला येथे तिसऱया स्थानी बढती देण्यात आली. तिला स्वस्तात बाद करत विंडीजने ऑस्ट्रेलियाला 3 बाद 235 असे रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर लॅनिंग व बेथ मुनी यांनी आणखी फटकेबाजी करत संघाला सहजपणे 300 धावांचा टप्पा पार करुन दिला. आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 45 षटकात 3 बाद 305 (ऍलिसा हिली 107 चेंडूत 129, रॅशेल हेन्स 100 चेंडूत 85, बेथ मुनी 31 चेंडूत नाबाद 43, लॅनिंग नाबाद 26. चिनेले हेन्री 2-51, कॉनेल 1-45).
विंडीज ः 37 षटकात सर्वबाद 148 (स्टेफानी टेलर 75 चेंडूत 4 चौकारांसह 48, हिली मॅथ्यूज 49 चेंडूत 34, दियान्द्रा डॉटिन 35 चेंडूत 5 चौकारांसह 34. अवांतर 9. जेस जोनास्सन 2-14, मेगन स्कट, सुदरलँड, तहिला, ऍलाना, गार्डनर प्रत्येकी 1 बळी).