वृत्तसंस्था/ मेलबर्न
2021 च्या टेनिस हंगामातील पहिली ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा येथे 8 फेब्रुवारीपासून खेळविली जाणार आहे. दरम्यान कोरोना समस्येमुळे या स्पर्धेवर चिंतेचे सावट पसरले आहे. स्पर्धा आयोजकांनी विविध देशांच्या टेनिसपटूंसाठी सक्तीचे क्वारंटाईन केले आहे. या क्वारंटाईनमध्ये असलेल्या टेनिसपटू, प्रशिक्षक यापैकी 9 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.
मेलबर्नच्या हॉटेल्समध्ये टेनिसपटूंसाठी आयसोलेशनची व्यवस्था करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना बाधित नवे रूग्ण पुन्हा मिळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शासनाच्या आरोग्य विभागातर्फे कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. या स्पर्धेसाठी आतापर्यंत दाखल झालेल्या विविध देशांच्या टेनिसपटूंना 14 दिवसांच्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून या कालावधीच्या दुसऱया आठवडय़ाला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी विविध देशांचे सुमारे 970 व्यक्ती मेलबर्नमधील विविध हॉटेल्समध्ये दाखल होत आहेत. स्पेनच्या पाओला बेडोसाला कोरोनाची बाधा झाली आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी टेनिस ऑस्ट्रेलियाने महिला टेनिसपटूंसाठी 3 ते 7 फेब्रुवारी दरम्यान सरावाची टेनिस स्पर्धा आयोजित केली आहे.