वृत्तसंस्था/ मेलबोर्न
2021 च्या टेनिस हंगामातील येथे पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला 8 फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. कोरोना महामारी समस्येमुळे या स्पर्धेसाठी शौकिनांच्या नेहमीच्या उपस्थितीपैकी 50 टक्के शौकिनांना परवानगी देण्यात आली आहे. या स्पर्धेवेळी प्रत्येक दिवशी सुमारे 30 हजार टेनिस शौकिनांना परवानगी राहील, अशी माहिती व्हिक्टोरिया राज्याचे क्रीडामंत्री मार्टिन पेकुला यांनी शनिवारी दिली.
ही स्पर्धा सुरू झाल्यानंतर शेवटच्या पाच दिवसांच्या कालावधीत सामन्यांची संख्या कमी असल्याने उपस्थित राहणाऱया प्रेक्षकांच्या संख्येमध्ये कपात करण्यात येणार असून प्रेक्षकांची संख्या 25 हजार जवळपास राहील, असेही पेकुला यांनी सांगितले.
गेल्या मार्च महिन्यात कोरोना महामारीला प्रारंभ झाल्यानंतर ऑस्ट्रेलियात सर्वाधिक प्रेक्षकांची उपस्थिती पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पाहावयास मिळेल. सदर स्पर्धा 14 दिवस चालणार असून दरम्यान मेलबर्न पार्कच्या परिसरात एकूण अंदाजे 390,000 प्रेक्षकांची हजेरी राहील. व्हिक्टोरिया राज्यामध्ये गेल्या सलग 13 दिवसांच्या कालावधीत कोरोनाचा एकही रूग्ण आढळलेला नाही. ऑस्ट्रेलियात कोरोना लसीकरणाला फेब्रुवारीच्या अखेरीस प्रारंभ होईल.