वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडचा 141 धावांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 50 षटकांत 8 बाद 269 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडचा डाव 128 धावांत संपुष्टात आला. गोलंदाजी, फलंदाजी या दोन्ही विभागात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची कामगिरी दर्जेदार झाली. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने सहावेळा विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावामध्ये एलीस पेरीने 68 तर मॅकग्राने 57 त्याचप्रमाणे संघात पुनरागमन करणाऱया गार्डनरने 18 चेंडूत जलद नाबाद 48 धावा झळकविल्या. न्यूझीलंडच्या ताहुहूने 53 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडचा डाव 31 षटकांत 128 धावांत आटोपला. न्यूझीलंड संघातील सॅटरवेटने 44 तर ताहुहूने 23 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे डार्सी ब्राऊनने 22 धावांत 3, वेलिंग्टनने 34 धावांत 2 आणि गार्डनरने 15 धावांत 2 गडी बाद केले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियन संघाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले असून त्यांनी आतापर्यंत आपले तिन्ही सामने जिंकले आहेत. न्यूझीलंडचा संघ या पराभवामुळे चौथ्या स्थानावर फेकला केला आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 8 बाद 269 (पेरी 68, मॅकग्रा 57, गार्डनर नाबाद 48, ताहुहू 3-53), न्यूझीलंड 31 षटकांत सर्वबाद 128 (सॅटरवेट 44, ताहुहू 23, ब्राऊन 3-22, वेलिंग्टन 2-34, गार्डनर 2-15).