वृत्तसंस्था/ कराची
येथे सुरू असलेल्या दुसऱया क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाने यजमान पाकविरूद्ध पहिल्या डावात 8 बाद 505 धावांचा डोंगर रचला. ऑस्ट्रेलियन संघातील उस्मान ख्वाजाने शतक (160) तर स्मिथ आणि कॅरे यांनी अर्धशतके झळकविली.
ऑस्ट्रेलियाने 3 बाद 251 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. उस्मान ख्वाजा आणि लियॉन यांनी चौथ्या गडय़ासाठी 54 धावांची भर घातली. अश्रफने लियॉनला त्रिफळाचीत केले. त्याने 5 चौकारांसह 38 धावा जमविल्या. हेडने 5 चौकारांसह 23 तर कॅमेरून ग्रीनने 1 षटकार आणि दोन चौकारांसह 28 धावा केल्या. शतकवीर ख्वाजा सहाव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. त्याने 369 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह 160 धावा झळकविल्या. ऍलेक्स कॅरेने समयोचित फलंदाजी करत 159 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 93 धावा झळकविल्याने ऑस्ट्रेलियाला 500 धावांचा टप्पा ओलांडता आला. स्टार्क आणि कॅरे यांनी आठव्या गडय़ासाठी 98 धावांची भागिदारी केली. बाबर आझमने कॅरेचा त्रिफळा उडविला. कॅरेचे शतक 7 धावांनी हुकले. स्टार्क 2 चौकारांसह 28 धावांवर खेळत आहे. पाकतर्फे अश्रफ आणि साजीद खान यांनी प्रत्येकी दोन तर हसन अली, नौमन अली, बाबर आझम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प. डाव 180 षटकांत 8 बाद 505 (उस्मान ख्वाजा 160, कॅरे 93, स्मिथ 72, लियॉन 38, वॉर्नर 36, हेड 23, ग्रीन 28, स्टार्क खेळत आहे 28, अश्रफ 2-55, साजीद खान 2-151, हसन अली 1-67, नौमन अली 1-115, बाबर आझम 1-7).