सिडनीः ऑस्ट्रेलियन कसोटी सलामीवीर विल पुकोवस्कीला उजव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागणार असून यामुळे तो कदाचित 6 महिने खेळू शकणार नाही, असे त्याच्या व्हिक्टोरिया प्रथमश्रेणी संघाने गुरुवारी जाहीर केले. पुकोवस्कीला मागील महिन्यात सिडनीत कसोटी पदार्पणातच दुखापत झाली होती. क्षेत्ररक्षण करताना चेंडू अडवताना तो दुखापतग्रस्त झाला. याशिवाय, पाहुण्या संघाविरुद्ध सराव सामन्यात डोक्यावर चेंडू आदळल्याने तो दोन कसोटी सामन्यात कन्कशनमुळे खेळू शकला नव्हता.
23 वर्षीय पुकोवस्की सध्या शेफील्ड शिल्ड हंगामासाठी व्हिक्टोरिया संघाकडून सराव करत होता. पण, मागील आठवडय़ात फलंदाजीचा सराव करत असताना त्याला वेदना जाणवल्या. त्यानंतर वैद्यकीय चाचणी केली गेली आणि अहवालात त्याच्या दुखापतीचे स्वरुप स्पष्ट झाले. शिवाय, शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्लाही दिला गेला. क्रिकेट व्हिक्टोरियाचे महाव्यवस्थापक शॉन ग्राफ यांनी ईमेलद्वारे ही माहिती दिली. ऑस्ट्रेलियन संघ घरच्या मैदानावर नोव्हेंबरमध्ये इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिका खेळणार असून त्यापूर्वी पुकोवस्कीला पूर्ण तंदुरुस्त होण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, या दृष्टीने त्याच्या शस्त्रक्रियेची वेळ ठरवली जाणार आहे.