लाहोरमधील पहिल्या वनडेत 88 धावांनी बाजी, 3 सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी, हेडचे अष्टपैलू योगदान
लाहोर / वृत्तसंस्था
ट्रव्हिस हेडने फलंदाजीत शतक व गोलंदाजीत 2 बळी, असे अष्टपैलू योगदान दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात 88 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला व 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर 50 षटकात 7 बाद 313 धावांचा डोंगर रचला तर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव 45.2 षटकात सर्वबाद 225 धावांवर आटोपला. ट्रव्हिस हेडला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विजयासाठी 314 धावांचा पाठलाग करताना यजमान पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाप्रमाणे फ्लाईंग स्टार्टची अपेक्षा होती. मात्र, ट्रव्हिस हेडने सलामीवीर फखर झमानला सीन ऍबॉटकरवी 18 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. इमाम-उल-हक व बाबर आझम यांनी 9.5 षटकात संघाला अर्धशतकी टप्पा पार करुन दिला. शिवाय, या जोडीने अर्धशतकी भागीदारीही साकारली. या जोडीची 96 धावांची भागीदारी पदार्पणवीर लेगब्रेक गोलंदाज मिशेल स्वेप्सनने संपुष्टात आणली. आझमने 72 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. त्यानंतर पाकिस्तानचे फलंदाज ठरावीक अंतराने तंबूत परतत राहिले. इमामने मात्र एक बाजूने 6 चौकार व 3 षटकारांसह शानदार शतक साजरे केले. त्याने 96 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारासह 103 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियातर्फे ऍडम झाम्पाने 10 षटकांचा कोटा पूर्ण करताना 38 धावात 4 बळी घेतले. ट्रव्हिस हेडने 2 फलंदाजांना बाद केले. स्वेप्सन व नॅथन इलिस यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाच्या डावात ट्रव्हिस हेडचे शतक लक्षवेधी ठरले. त्याने 72 चेंडूत 12 चौकार, 3 षटकारांसह 101 धावा फटकावल्या. बेन मॅकडरमॉटने 70 चेंडूत 4 चौकारांसह 55 धावांचे योगदान दिले तर कॅमेरुन ग्रीन 30 चेंडूत 40 धावांवर नाबाद राहिला.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 50 षटकात 7 बाद 313 (ट्रव्हिस हेड 72 चेंडूत 12 चौकार, 3 षटकारांसह 101, बेन मॅकडरमॉट 55, कॅमेरुन ग्रीन नाबाद 40. हॅरिस रौफ व झाहिद प्रत्येकी 2 बळी, इफ्तिकार, खुशदिल प्रत्येकी 1 बळी).
पाकिस्तान ः 45.2 षटकात सर्वबाद 225 (इमाम-उल-हक 96 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 103, बाबर आझम 72 चेंडूत 6 चौकारांसह 57. ऍडम झाम्पा 4-38, स्वेप्सन व हेड प्रत्येकी 2 बळी, इलिस व ऍबॉट प्रत्येकी 1 बळी).