वृत्तसंस्था/ ब्रिजटाऊन
ऑस्ट्रेलियाने यजमान विंडीजचा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. सोमवारी झालेल्या या मालिकेतील तिसऱया निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेंडीजवर 6 गडय़ांनी विजय मिळविला. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला ‘मालिकावीर’ तर ऍस्टन ऍगरला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा डाव 45.1 षटकांत 152 धावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 30.3 षटकांत 4 बाद 153 धावा जमवित हा सामना 117 चेंडू बाकी ठेवून 6 गडय़ांनी जिंकला.
विंडीजच्या डावात सलामीच्या लुईसने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 66 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 55 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर विंडीजच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. डरेन ब्रॅव्होने 1 षटकारांसह 18, कर्णधार पोलार्डने 1 षटकारांसह 11, जोसेफने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 15 तसेच होपने 14 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 6 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे स्टार्कने 43 धावांत 3 तर हॅझलवूड, ऍगर आणि झंपा यांनी प्रत्येकी 2 तसेच टर्नरने एक गडी बाद पेला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात मॅथ्यू वेडने 52 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 51, कर्णधार कॅरेने 50 चेंडूत 3 चौकारांसह 35, मार्शने 21 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 29, ऍगरने 33 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 19, फिलीपने 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 5 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे कॉट्रेल, हुसेन, जोसेफ आणि वॉल्श यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
विंडीजच्या दौऱयात ऑस्ट्रेलियन संघाला पाच सामन्यांची टी-20 मालिका 1-4 अशा फरकाने गमवावी लागली होती पण ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशी जिंकून या दौऱयाचा शेवट केला. वनडे मालिकेत वेंडीजची फलंदाजी निकृष्ट झाल्याने आम्हाला पराभव पत्करावा लागला, अशी प्रतिक्रिया विंडीजचा कर्णधार पोलार्डने व्यक्त केली.
संक्षिप्त धावफलक ः विंडीज 45.1 षटकांत सर्वबाद 152 (लुईस नाबाद 55, होप 14, डरेन ब्रॅव्हो 18, पोलार्ड 11, जोसेफ 15, स्टार्क 3-43, हॅझलवूड 2-18, ऍगर 2-31, झंपा 2-29, टर्नर 1-23) ऑस्ट्रेलिया 30.3 षटकांत 4 बाद 153 (फिलीप 10, कॅरे 35, मार्श 29, वेड नाबाद 51, ऍगर नाबाद 19, कॉट्रेल, हुसेन, वॉल्श, जोसेफ प्रत्येकी एक बळी).