वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या ताज्या वनडे प्रकारातील मानांकनात ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू इलेसी पेरीने अष्टपैलूंच्या यादीत पुन्हा अग्रस्थान पटकाविले. गेल्या सप्टेंबरमध्ये भारताविरूद्ध झालेल्या वनडे मालिकेनंतर पेरी अष्टपैलूंच्या मानांकन यादीत दुसऱया स्थानावर होती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱया सामन्यात इलेसी पेरीला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या सामन्यात इंग्लंडचा डाव 129 धावांत आटोपला. पेरीने 12 धावांत 3 गडी बाद केले. त्यानंतर फलंदाजीत पेरीने 64 चेंडूत 40 धावा झळकविल्या. इलेसी पेरीने वनडे गोलंदाजांच्या यादीत नववे स्थान मिळविले आहे. ब्रंटने अष्टपैलूंच्या मानांकन यादीत पाचवे स्थान त्याचप्रमाणे गोलंदाजांच्या यादीत सहावे स्थान पटकाविले. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीने फलंदाजांच्या यादीत तिसरे स्थान मिळविले आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ही मालिका जिंकली आहे.