वृत्तसंस्था/ गोल्डकोस्ट
येथे सुरू असलेल्या चार दिवसांच्या एकमेव दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यावर भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले वर्चस्व राखले. शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 4 बाद 143 धावा जमविल्या. तत्पूर्वी भारतीय संघाने पहिला डावात 8 बाद 377 धावावर घोषित केला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर 234 धावांची आघाडी मिळविली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात भारताच्या झुलन गोस्वामीने 2 गडी बाद केले.
या कसोटीतील शनिवारी खेळाच्या तिसऱया दिवशी पावसाचा अडथळा आल्याने थोडा खेळ वाया गेला. भारतीय संघाने 5 बाद 276 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि उपाहारापर्यंत त्यांनी 7 बाद 359 धावापर्यंत मजल मारली. खेळाच्या पहिल्या सत्रात भारताने दोन गडी गमविताना 83 धावांची भर घातली.
तानिया भाटिया आणि पुजा वस्त्रकार हे दोन फलंदाज बाद झाले. तानियाने 75 चेंडूत 3 चौकारांसह 22 तर वस्त्रकारने 48 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. तानियाने दिप्ती शर्मासमवेत सहाव्या गडय़ासाठी 45 धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या कँपबेलने तानियाला हिलीकरवी झेलबाद केले. कँपबेलचा हा कसोटीतील पहिला बळी ठरला. शर्माने आक्रमक खेळी करत कसोटीतील आपले दुसरे अर्धशतक 148 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. उपाहारापूर्वी पेरीने पुजा वस्त्रकारला मुनीकरवी झेलबाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पेरीचा हा 300 वा बळी ठरला. महिलांच्या क्रिकेटमध्ये 5000 धावा आणि 300 बळी मिळविणारी ऑस्ट्रेलियाची इलेसी पेरी ही एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.
खेळाच्या दुसऱया सत्रामध्ये भारताची दिप्ती शर्मा कँपबेलच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. तिने 167 चेंडूत 8 चौकारांसह 66 धावा झळकविल्या. भारताच्या डावात सर्वाधिक धावा करणारी शर्मा दुसरी फलंदाज ठरली. या कसोटीत स्मृती मानधनाने दमदार शतक (127) झळकवेले. भारताने 145 षटकांत 8 बाद 377 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. गोस्वामी 7 तर मेघना सिंग 2 धावांवर नाबाद राहिले. ऑस्ट्रेलियातर्फे इलेसी पेरी आणि कँपबेल यांनी प्रत्येकी दोन तर गॉर्डनरने एक तसेच मोलीनेक्सने दोन गडी बाद केले.
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाला सुरूवात झाल्यानंतर भारताच्या झुलन गोवास्वामीने ऑस्ट्रेलियाला दोन जबरदस्त धक्के दिले. ऑस्ट्रेलियाची एकवेळ स्थिती 2 बाद 63 अशी होती. चहापानावेळी ऑस्ट्रेलियाने 2 बाद 69 धावापर्यंत मजल मारली होती. गोस्वामीने ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज बेथ मुनीचा 4 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर अनुभवी ऍलिसा हिलीला तिने तानिया भाटियाकरवी झेलबाद केले. हिलीने 66 चेंडूत 3 चौकारांसह 29 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये ऑस्ट्रेलियाची कर्णधार लेनिंग पुजा वस्त्रकारच्या गोलंदाजीवर पायचीत झाली. तिने 78 चेंडूत 7 चौकारांसह 38 धावा जमविल्या. वस्त्रकारने मॅकग्राला मानधनाकरवी झेलबाद केले. मॅकग्राने 68 चेंडूत 4 चौकारांसह 28 धावा जमविल्या. गार्डनर 1 चौकारांसह 13 धावांवर खेळत आहे. ही कसोटी आता अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे. भारतातर्फे झुलन गोस्वामी आणि पुजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक भारत प. डाव-145 षटकांत 8 बाद 377 डाव घोषित (स्मृती मानधना 127, शेफाली वर्मा 31