वृत्तसंस्था/ रावळपिंडी
येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत रविवारी खेळाच्या तिसऱया दिवशी ऑस्ट्रेलियाने यजमान पाकला पहिल्या डावात चोख प्रत्युत्तर देताना 2 बाद 271 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाचे शतक तीन धावांनी हुकले तर डेव्हिड वॉर्नर आणि लाबुशाने यांनी शानदार अर्धशतके झळकविली. ऑस्ट्रेलियाचा संघ अद्याप 205 धावांनी पिछाडीवर आहे.
या कसोटीत यजमान पाकने पहिल्या डावात भक्कम फलंदाजी करत 4 बाद 476 धावांवर पहिल्या डावाची घोषणा केली. इमाम उल हक आणि अझहर अली यांनी शानदार शतके झळकविताना दुसऱया गडय़ासाठी 208 धावांची भागिदारी केली. इमाम उल हकने 157 तर अझहर अलीने 185 धावा झळकविल्या. अब्दुला शफीकने 44, कर्णधार बाबर आझमने 36, रिझवानने नाबाद 29 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे लियॉन, कमिन्स आणि लाबुशाने यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला,.
ऑस्ट्रेलियाने बिनबाद 5 या धावसंख्येवरून तिसऱया दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. उस्मान ख्वाजा आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीच्या जोडीने 40.4 षटकांत 156 धावांची भागिदारी केली. पाकच्या साजीद खानने वॉर्नरचा त्रिफळा उडविला. त्याने 114 चेंडूत 12 चौकारांसह 68 धावा जमविल्या. वॉर्नर बाद झाल्यानंतर लाबुशाने आणि उस्मान ख्वाजा यांनी दुसऱया गडय़ासाठी 47 धावांची भर घातली. शतकासमीप आलेला उस्मान ख्वाजा नौमन अलीच्या गोलंदाजीवर इमाम उल हककरवी झेलबाद झाला. त्याने 159 चेंडूत 15 चौकारांसह 97 धावा जमविल्या. लाबुशाने आणि स्टीव्ह स्मिथ ही जोडी दिवसअखेर नाबाद राहिली. या जोडीने तिसऱया गडय़ासाठी अभेद्य 68 धावांची भर घातली. लाबुशाने 117 चेंडूत 9 चौकारांसह 69 तर स्टीव्ह स्मिथ 55 चेंडूत 3 चौकारांसह 24 धावांवर खेळत आहेत. पाकतर्फे साजीद खान आणि नौमन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी तिसऱया दिवशीचा खेळ लवकर थांबविला. दिवसभरात 72 षटके टाकण्यात आली.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव 162 षटकांत 4 बाद 476 डाव घोषित (अझहर अली 185, इमाम उल हक 157, शफीक 44, बाबर आझम 36, रिझवान नाबाद 29, इफ्तिकार अहमद नाबाद 13, लियॉन 1-161, कमिन्स 1-62, लाबुशाने 1-53), ऑस्ट्रेलिया प. डाव 73 षटकांत 2 बाद 271 (उस्मान ख्वाजा 97, वॉर्नर 68, लाबुशाने खेळत आहे 69, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे 24 नौमन अली 1-49, साजीद खान 1-94).