वृत्तसंस्था/ लाहोर
तिसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीतील मंगळवारी खेळाच्या दुसऱया दिवशी ग्रीन आणि कॅरे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 391 धावापर्यंत मजल मारली. पाकच्या शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 4 बळी मिळविले. दिवसअखेर पाकने पहिल्या डावात 1 बाद 90 धावा जमविल्या.
ऑस्ट्रेलियाने 5 बाद 232 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केली आणि त्यांच्या उर्वरित पाच गडय़ांनी 159 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 133.3 षटकांत 391 धावांवर आटोपला. खेळाच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी अर्धशतके झळकविली होती तर दुसऱया दिवशी ग्रीन आणि कॅरे यांनी अर्धशतके नोंदविली. ऑस्ट्रेलियाच्या डावात चार फलंदाजांनी अर्धशतके नोंदविली. ग्रीन आणि कॅरे या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 135 धावांची भागिदारी केली. नौमन अलीने कॅरेला पायचीत केले. त्याने 5 चौकारांसह 67 धावा जमविल्या. कॅरे बाद झाल्यानंतर ग्रीन काही वेळातच तंबूत परतला. नसीम शहाने ग्रीनचा त्रिफळा उडविला. त्याने 9 चौकारांसह 79 धावा जमविल्या. पाकच्या शाहीन आफ्रिदीने आखस्ट्रेलियाचे शेपूट झटपट गुंडाळले. स्टार्कने 13, कर्णधार कमिन्सने नाबाद 11, लियॉनने 4 तर स्वेपसनने 9 धावा जमविल्या. पाकच्या शाहीन आफ्रिदीने 79 धावांत 4 तर नसीम शहाने 58 धावांत 4, नौमन अली आणि साजीद खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
त्यानंतर पाकच्या पहिल्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. संघाची धावसंख्या 20 असताना सलामीचा इमाम उल हक कमिन्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने दोन चौकारांसह 11 धावा जमविल्या. अब्दुला शफीक आणि अझहर अली या जोडीने संघाची अधिक पडझड होवू दिली नाही. दिवसअखेर पाकने 39 षटकांत 1 बाद 90 धावा जमविल्या. शफीक 6 चौकारांसह 45 तर अझहर अली 1 षटकार आणि 1 चौकारांसह 30 धावांवर खेळत असून या जोडीने दुसऱया गडय़ासाठी अभेद्य 70 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियातर्फे कमिन्सने 27 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः ऑस्ट्रेलिया प. डाव 133.3 षटकांत सर्वबाद 391 (उस्मान ख्वाजा 91, स्टीव्ह स्मिथ 59, ग्रीन 79, कॅरे 67, हेड 26, स्टार्क 13, कमिन्स नाबाद 11, शाहीन आफ्रिदी 4-79, नसीम शहा 4-58, नौमन अली 1-77, साजीद खान 1-97), पाक प. डाव 39 षटकांत 1 बाद 90 (शफीक खेळत आहे 45, अझहर अली खेळत आहे 30, इमाम उल हक 11, कमिन्स 1-27).