कॅनबरा
गुगलने अखेर ऑस्ट्रेलियाच्या माध्यम संस्थांना न्यूजच्या बदल्यात पैसे देणार असल्याची हमी दिली आहे. अमेरिकतील दिग्गज टेक कंपनीने शुक्रवारी न्यूज शोकेस नावाचे एक प्लॅटफॉर्म सादर केले आहे, ज्यामध्ये बातम्यांसाठी पेमेन्ट्स करता येणार असल्याचे म्हटले आहे. गुगलने या अगोदर ऑस्ट्रेलियन सरकारी माध्यम संस्थांना पेमेन्ट करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्याला विरोध केला होता. परंतु आता कॅनबरा टाईम्ससह अन्य सात माध्यम संस्थांसोबत करार करुन बातम्यांसाठी पैसे देण्याची सहमती दर्शविण्यात आली आहे. न्यूज शोपेसला गुगलने मागील वर्षातील जूनमध्ये ब्राझिल आणि जर्मनीमध्ये प्रथमच रोल आउट केले होते. ऑनलाईन जाहिरात बाजारात गुगलची हिस्सेदारी 53 टक्के आणि फेसबुकची 23 टक्के आहे. या अगोदर गुगलने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला धमकी दिली होती. मात्र सदरच्या बदलामुळे दोघांमधील तणावाचे वातावरण कमी होण्यास मदत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.