वृत्तसंस्था / कॅनबरा
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी समोश्यासंबंधी दिलेले निमंत्रण पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले आहे. मोदींनी मॉरिसन यांच्या ट्विटला रीट्विट करत कोरोना विषाणू विरोधात निर्णायक विजय मिळविल्यावर एकत्र बसून समोसा खाऊया अशी टिप्पणी नमूद केली आहे. तसेच पंतप्रधानांनी 4 जून रोजी होणाऱया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसंबंधी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
मॉरिसन यांच्या हातातील समोसा स्वादिष्ट दिसून येतोय. कोरोना संकटावर निर्णायक मात केल्यावर आम्ही एकत्र बसून समोशाचा आनंद घेऊया. 4 जून रोजी होणाऱया व्हिडिओ कॉन्फरन्सिंगबद्दल उत्सुक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
मॉरिसन यांनी रविवारी समोसा आणि आंब्याच्या चटणीचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत या खाद्यपदार्थाचा आनंद घेऊ इच्छितो असे मॉरिसन यांनी नमूद केले होते. तसेच त्यांनी स्वतःच्या समोश्याला ‘स्कॉमोसा’ हे नाव दिले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत चालू आठवडय़ात व्हिडिओलिंकद्वारे बैठक होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी शाकाहारी असल्याने त्यांच्यासोबत समोसा खाणे अत्यंत विशेष ठरणार असल्याचे मॉरिसन यांनी ट्विट करत म्हटले आहे. मोदी आणि मॉरिसन यांच्यादरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया शिखर परिषद 4 जून रोजी आयोजित होणार आहे. या परिषदेदरम्यान दोन्ही नेते व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत. परिषदेत द्विपक्षीय व्यापार, संरक्षण आणि तंत्रज्ञानाच्या आदान-प्रदानसंबंधी अनेक करारही होऊ शकतात.