वृत्तसंस्था/ मेलबोर्न
येत्या फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱया टी-20 मालिकेसाठी शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 18 जणांचा संघ घोषित केला आहे. या संघामध्ये भारतीय वंशाचा तनवीर सांघा याचा समावेश झाला आहे.
तनवीर सांघा याचे कुटुंब पंजाबमध्ये काही वर्षापूर्वी स्थायिक होते. शेतीचा व्यवसाय करणाऱया या कुटुंबाने ऑस्ट्रेलियात स्थलांतर केले. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघामध्ये भारतीय वंशाच्या खेळाडूचा समावेश करण्याची ही दुसरी खेप आहे. 19 वषीय तनवीर हा लेगस्पिनर म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलियातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भारतीय वंशाचे अनेक क्रिकेटपटू विविध वयोगटातील संघांचे प्रतिनिधित्व करीत असतात. 19 वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियातील विविध संघांमध्ये भारतीय वंशाच्या जेसन सांघा, अर्जुन नायर, पी. उप्पल प्रतिनिधित्व करीत आहेत. पण यापूर्वी गुरींदर संधू या पंजाबी भारतीय वंशाच्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळविले होते. गुरींदर संधू याचे पालक भारतीय वंशाचे आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघामध्ये 1877 साली सहभागी झालेले ब्रेन्सबाय कूपर, 1964 साली रेक्स सेलर्स, 2006 साली स्टुअर्ट क्लार्क या क्रिकेटपटूंचे पालक भारतीय वंशाचेच होते. 1997 साली तनवीरचे आईवडील जालंधर येथून सिडनीला स्थायिक झाले होते. तनवीरचे वडील जोगासिंग हे पंजाबमध्ये शेती व्यवसाय करीत होते. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्टेलियामध्ये सुरुवातीला त्यांनी टॅक्सीचालक म्हणून व्यवसाय केला होता. तनवीरची आई उपनीत ही एका कार्यालयात लेखनिक म्हणून नोकरी करीत आहे.