न्यूझीलंडविरुद्ध 64 धावांनी विजय,
वेलिंग्टन / वृत्तसंस्था
प्रदीर्घ कालावधीपासून खराब फॉर्ममध्ये राहिलेल्या ऍरॉन फिंचने अपयशाची कोंडी फोडत झळकावलेले अर्धशतक व ऍस्टॉन ऍगरची 30 धावात 6 बळीची विक्रमी गोलंदाजी यामुळे ऑस्ट्रेलियाने यजमान न्यूझीलंडचा 64 धावांनी धुव्वा उडवत 5 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडची आघाडी 2-1 अशी कमी केली. ऍस्टॉन ऍगरची ऑस्ट्रेलियातर्फे टी-20 क्रिकेटमधील ही सर्वोत्तम गोलंदाजी आहे. ऑस्ट्रेलियाने प्रारंभी 20 षटकात 4 बाद 208 धावा झळकावल्या तर प्रत्युत्तरात ऍगरच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडचा डाव 17.1 षटकात 144 धावांमध्येच गुंडाळला गेला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात ग्लेन मॅक्सवेल (31 चेंडूत 70) व ऍरॉन फिंच (44 चेंडूत 69) यांची झंझावाती अर्धशतके वैशिष्टय़पूर्ण ठरली. याशिवाय, जोश फिलीपने सामन्याच्या उत्तरार्धात 27 चेंडूत 43 धावा झोडपल्या. किवीज संघातर्फे ईश सोधीने 32 धावात 2 बळी घेतले तर साऊदी, बोल्ट यांनी प्रत्येकी 1 फलंदाज बाद केला.
विजयासाठी 209 धावांचे तगडे आव्हान असताना न्यूझीलंडचा संघ यशाच्या आसपास देखील फिरकू शकला नाही. केवळ गप्टीलने 28 चेंडूत 43 धावांची खेळी साकारत थोडाफार प्रतिकार केला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ऍस्टॉन ऍगरने 13 व्या एकाच षटकात ग्लेन फिलीप्स (13), डेव्हॉन कॉनवे (38) व जेम्स नीशम (0) यांना बाद केले आणि यामुळे न्यूझीलंडची 6 बाद 110 अशी पडझड झाली. यातून त्यांना शेवटपर्यंत सावरता आले नाही. या मालिकेतील पुढील लढत शुक्रवारी वेलिंग्टनमध्येच खेळवली जाणार आहे.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 20 षटकात 4-208 (ग्लेन मॅक्सवेल 31 चेंडूत 8 चौकार, 5 षटकारांसह 70, ऍरॉन फिंच 44 चेंडूत 8 चौकार, 2 षटकारांसह 69, जोश फिलीप 27 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 43, ईश सोधी 2-32, साऊदी, बोल्ट प्रत्येकी 1 बळी).
न्यूझीलंड ः 17.1 षटकात सर्वबाद 144 (मार्टिन गप्टील 28 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारासह 43, डेव्हॉन कॉनवे 27 चेंडूत 5 चौकार, 1 षटकारासह 38. ऍस्टॉन ऍगर 4 षटकात 30 धावात 6 बळी).
मॅक्सवेलच्या षटकाराने फुटलेल्या खुर्चीचा लिलाव!
ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने 31 चेंडूत 70 धावा फटकावताना किवीज गोलंदाजी फोडून काढलीच. शिवाय, त्याच्या एका उत्तूंग षटकाराने प्रेक्षक गॅलरीतील एक खुर्चीही फुटली. वेस्टपॅक स्टेडियमवरील या लढतीत जेम्स नीशमच्या षटकात त्याने हा षटकार खेचला. नीशमच्या या षटकात एकूण 28 धावांची लयलूट झाली. सामना संपल्यानंतर सदर खुर्ची काढण्यात आली. त्यावर मॅक्सवेलने आपली स्वाक्षरी केली असून या खुर्चीचा लिलाव केला जाणार आहे.