वृत्तसंस्था / टोकियो
पुढील महिन्यात येथे होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या महिला सॉफ्टबॉल संघाचे मंगळवारी आगमन झाले. ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाचे ऑलिंपिकपूर्वी येथे सराव शिबीर आयोजित केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाचे जपानमध्ये मंगळवारी आगमन झाले. टोकियोपासून 80 कि.मी. अंतरावर असलेल्या ओटा शहरामध्ये ऑस्ट्रेलिया सॉफ्टबॉल संघाचे वास्तव्य राहील. या ठिकाणी 47 दिवसांचे प्रशिक्षण सराव शिबीर घेतले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या सॉफ्टबॉल संघाने यापूर्वी झालेल्या चार ऑलिंपिक स्पर्धामध्ये पदके मिळविली आहेत. 1996, 2000, 2008 च्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक तर 2004 च्या ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन सॉफ्टबॉल संघाचा पहिला सामना 21 जुलैला यजमान जपानबरोबर होणार आहे. जपानने 2008 साली सॉफ्टबॉलमध्ये ऑलिंपिकचे सुवर्णपदक मिळविले होते. 23 जुलैला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे. पण या स्पर्धेपूर्वी दोन दिवस अगोदर सॉफ्टबॉल क्रीडाप्रकाराला सुरूवात होणार आहे.
कोरोना समस्येमुळे जपानच्या जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण जपानमध्ये सध्या कोरोनाची चौथी लाट सुरू असून शासनाकडून कोरोना नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. देशातील लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. जपानमध्ये एकूण लोकसंख्येच्या केवळ 3 टक्के लोकांचे लसीकरण झाले असल्याने शासनाकडून येत्या काही दिवसांत लसीकरणाची प्रक्रिया जलद राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्यावर्षी कोरोना समस्येमुळे टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षांसाठी लांबणीवर टाकण्यात आली होती. पुन्हा या समस्येमुळे जुलै महिन्यात होणारी ऑलिंपिक स्पर्धा पुढे ढकलावी यासाठी जपानच्या जनतेने शासनाकडे मागणी केली आहे.