वृत्तसंस्था/ मेलबोर्न
कोरोना महामारीमुळे जागतिक स्तरावरील सर्व क्रिकेट हालचाली थांबविण्यात आल्या आहेत. बऱयाच देशातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर तर काही स्थगित करण्यात आल्या. क्रिकेट खेळणाऱया बऱयाच देशांचे दौरे पुढे ढकलण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियातही सर्व क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता 6 जूनपासून या देशात क्लबस्तरीय क्रिकेट स्पर्धेला पुन्हा प्रारंभ केला जाणार आहे.
डार्विन आणि जिल्हा क्रिकेट टी-20 स्पर्धेला 6 जूनपासून प्रारंभ होईल. या स्पर्धेत चेंडूला लकाकी आणण्यासाठी वापरण्यात येणाऱया सॅलीव्हावर बंदी घालण्याचा निर्णय डार्विन क्रिकेट व्यवस्थापक समितीने घेतला आहे. सॅलीव्हायाचा वापर केल्यास कोरोनाचा धोका निर्माण होवू शकतो, असे आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. क्लबस्तरीय क्रिकेट स्पर्धा भरविताना कोव्हिड-19 सुरक्षा नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे लेखी आश्वासन स्पर्धा आयोजकातर्फे संबंधीत शासनाकडे देण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे पदाधिकारी या स्पर्धा आयोजकांशी सविस्तर चर्चा करणार आहेत.