पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची घोषणा : 40 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 10 हजार प्रेक्षकांना प्रवेश देण्याची अट
मेलबर्न / वृत्तसंस्था
कोरोना व्हायरसचा अटकाव करण्यासाठी जे निर्बंध लादले गेले, ते टप्याटप्याने शिथिल करण्यास ऑस्ट्रेलियाने सुरुवात केली असून पुढील महिन्यापासून तेथे क्रीडा स्पर्धा सुरु करता येतील, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जाहीर केले. स्टेडियमची प्रेक्षकक्षमता 40 हजार असेल तर 10 हजार चाहत्यांना सामन्यावेळी प्रवेश दिला जाईल, अशी यासाठी त्यांनी अट घातली आहे.
‘विविध क्रीडा स्पर्धा, सामने, कॉन्सर्ट्स व उत्सव जुलैपासून साजरे करता येतील. पण, एकूण क्षमतेच्या 25 टक्के नागरिकांनाच यासाठी प्रवेश देता येईल’, असे मॉरिसन याप्रसंगी म्हणाले. शुक्रवारी राष्ट्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते माध्यमांना संबोधित करत होते.
‘स्टेडियममधील प्रेक्षकांच्या गॅलरीत एकमेकांपासून प्रत्येकाने विशिष्ट अंतर राखून रहावे, यासाठी आम्ही 25 टक्के चाहत्यांनाच प्रवेश देण्याची अट घातली आहे. चाहत्यांनी कुठे बसायचे, हे निश्चित करुन दिले जाईल आणि त्याचे त्यांनी पालन करायचे आहे. तिकिटावर ज्या-त्या चाहत्याचे नाव असेल, जेणेकरुन त्या इव्हेंटला कोण हजर होते, हे स्पष्ट होऊ शकेल’, असे मॉरिसन पुढे म्हणाले.
देशभरातील मुख्य आरोग्याधिकाऱयांच्या समन्वयाने अशा ठिकाणी नियमांचा तपशील निश्चित केला जात आहे, असे त्यांनी नमूद केले. अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी उपाययोजनांवर आमचा भर आहे. 100 व त्याहून अधिक नागरिक एकत्र येणार असतील तेथे प्रत्येकाने चार चौरस मीटर्सचे अंतर राखणे महत्त्वाचे असेल. ऑस्ट्रेलियात शिकणाऱया बाहेरील विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठीही आमचे प्रयत्न असणार आहोत’, अशी घोषणा मॉरिसन यांनी केली.
‘नियम निश्चित केले गेल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा होईल आणि ऑस्ट्रेलियन नागरिक खुल्या दिलाने त्याचे स्वागत करतील’, अशी अपेक्षा मॉरिसन यांनी व्यक्त केली. विदेशातील विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी पुन्हा ऑस्ट्रेलियात यावे, यासाठी काय प्रयत्न सुरु आहेत, याचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, ‘अशा विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या प्रक्रियेत ज्या-त्या शिक्षण संस्थांचा वाटा महत्त्वाचा असेल. या संस्थांनी आराखडा निश्चित केला तर बरेच काही सुरळीत होऊ शकेल. विदेशातील विद्यार्थी लवकर ऑस्ट्रेलियात येऊ शकतील, असे मला अजिबात सूचवायचे नाही. कारण, या सर्व प्रक्रियेचा आराखडा निश्चित करण्यासाठी अद्याप बरीच मेहनत घ्यावी लागेल’.
ऑस्ट्रेलियात अलीकडील कालावधीत नागरिकांनी सामुहिक रॅली व धिक्कार नोंदवण्यासाठी आयोजित मोर्चात उत्स्फूर्त हजेरी लावली, त्यावर मॉरिसन यांनी जोरदार टीका केली. मागील आठवडय़ाच्या अखेरीस कृष्णवर्णियांच्या रॅलीत ऑस्ट्रेलियातील नागरिक प्रचंड प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. मुख्यत्वेकरुन, सिडनी, मेलबर्न व ब्रिस्बेन येथे बऱयाच प्रमाणात निषेध मोर्चा निघाला होता. नेमके याच शहरांत कोव्हिड-19 चा प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला. त्यामुळेही मॉरिसन अधिक चिंतेत आहेत.
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी हिरवा कंदील?
ऑस्ट्रेलियन भूमीतच यंदा आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबरमध्ये होणे अपेक्षित आहे. तूर्तास, स्पर्धेबद्दल आयसीसीने थांबा व प्रतीक्षा करा, असे धोरण अवलंबले आहे. आता खुद्द ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनीच क्रीडा स्पर्धा अटीसह मंजूर करणार असल्याचे जाहीर केल्याने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियातच रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.