जेतेपदासह अग्रस्थानावर झेप, थिएमची झुंजार लढत, तिसऱया ग्रँडस्लॅममध्ये उपविजेतेपद,
वृत्तसंस्था/ मेलबर्न
सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने विक्रमी आठव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावत या स्पर्धेवरील आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले. मात्र यासाठी त्याला ऑस्ट्रियाच्या थिएमविरुद्ध पाच सेट्स संघर्ष करावा लागला. या जेतेपदाबरोबर त्याने जागतिक क्रमवारीत पुन्हा एकदा अग्रस्थान पटकावले आहे.
जोकोविचने मोसमातील अपराजित मालिका 13 व्या सामन्यापर्यंत वाढविली आहे. धाडसी खेळ करणाऱया पाचव्या मानांकित थिएमविरुद्ध पहिला सेट गमविल्यानंतर दोन सेट्सची पिछाडी भरून काढत विजयासाठी संघर्ष करावा लागला. जोकोविचने ही लढत 6-4, 4-6, 2-6, 6-3, 6-4 अशी जिंकली. सुमारे चार तास ही झुंज रंगली होती. त्याचे हे कारकिर्दीतील 17 वे ग्रँडस्लॅम जेतेपद असून नदालपेक्षा दोन आणि फेडररपेक्षा तीनने तो मागे आहे. 13 वेळा त्याने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि त्यापैकी आठवेळा तो विजेता ठरला आहे.
‘निश्चितच माझे हे सर्वात आवडते कोर्ट, आवडते स्टेडियम असून ही ट्रॉफी पुन्हा एकदा उंचावताना खूप आनंद वाटतो,’ असे जोकोविच म्हणाला. एकच ग्रँडस्लॅम स्पर्धा आठ किंवा त्याहून अधिक वेळा जिंकणारा तो तिसरा टेनिसपटूही बनला आहे. स्पेनच्या नदालने प्रेंच ओपनमध्ये 12 वेळा तर फेडररने आठ वेळा विम्बल्डनमध्ये जेतेपद पटकावलेले आहे. सोमवारी जागतिक टेनिसपटूंची ताजी क्रमवारी जाहीर करण्यात येईल, त्यावेळी जोकोविच पुन्हा एकदा अग्रस्थानावर असेल. नदाल दुसऱया स्थानावर फेकला जाईल तर फेडरर तिसऱया स्थानी कायम राहील. पराभूत झाला असला तरी थिएमलाही बढती मिळणार असून तो आता चौथ्या स्थानावर असेल. आजवरच्या कारकिर्दीतील त्याचे सर्वोच्च मानांकन असेल. यापूर्वी 7 ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पहिल्या तीनपैकी दोन सेट गमविल्यानंतर जोकोविचला जेतेपद मिळविता आलेले नाही. पहिल्यांदाच त्याने ही मालिका खंडित केली आहे. उपविजेत्या थिएमनेही जोकोविचसह नदाल व फेडररचेही कौतुक केले. ‘तू आणि अन्य दोघांनी (नदाल व फेडरर) पुरुष टेनिसचा दर्जा खूप उंचीवर नेऊन ठेवला आहे. अशा कालावधीत मी तुमच्याशी खेळू शकलो याचा मला खूप अभिमान व आनंद वाटतो. आज मी थोडा कमी पडलो असलो तरी लवकरच आपली पुन्हा भेट होईल,’ अशा भावना थिएमने व्यक्त केल्या. थिएमची ही तिसरी ग्रँडस्लॅम फायनल असून तीनही वेळा त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल आहे.
राम व सॅलिसबरी पुरुष दुहेरीत विजेतs
अकरावे मानांकन मिळालेल्या अमेरिकेचा राजीव राम व ब्रिटनचा जो सॅलिसबरी या स्पर्धेत वाईल्डकार्ड प्रवेश मिळालेल्या मॅक्स पर्सेल व ल्युक सेव्हिले यांची घोडदौड अंतिम फेरीत संपुष्टात आणत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. त्यांनी 6-4, 6-2 असा सहज मिळवित ट्रॉफी हस्तगत केली. अमेरिकन-ब्रिटिश जोडीने आपला दर्जा व अनुभव दाखवित पहिल्या सेटमधील सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली आणि दुसऱया सेटमध्ये आणखी दोनदा सर्व्हिस भेदत जेतेपद निश्चित केले. त्यांनी आपल्या सर्व्हिसवर फक्त सात गुण गमविले. पण एकदाही ब्रेकपॉईंटला सामोरे जावे लागले नाही. दोघांनी मिळून एकत्र खेळताना मिळविलेले त्यांचे हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. सॅलिसबरीने राजीव आपला जोडीदार झाला, याबद्दल त्याचे आभार मानले.
क्रेसिकोव्हा-मेक्टिक मिश्र दुहेरीत अजिंक्य
पाचव्या मानांकित बार्बरा क्रेसिकोव्हा व निकोला मेक्टिक यांनी एक सेटची पिछाडी भरून काढत अमेरिकचे बेथनी मॅटके सँड्स व ब्रिटनचा जेमी मरे यांच्यावर 5-7, 6-4, 10-1 अशी मात करून अजिंक्यपद पटकावले. बेथनी-मरे हे अमेरिकन ग्रँडस्लॅमचे विद्यमान चॅम्पियन आहेत. पण केसिकोव्हा-मेक्टिक यांनी टायब्रेकमध्ये सलग आठ गुण घेत जेतेपदावर शिक्कामोर्तब केला. झेकच्या पेसिकोव्हाने मागील वर्षीही येथे अमेरिकेच्या राजीव रामसमवेत जेतेपद मिळविले होते प्रोएशियाच्या मेक्टिकचे मात्र हे पहिलेच ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.