सिडनीमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियात डेल्टा कोरोना विषाणू संक्रमण वेगाने फैलावत आहे. न्यू साउथ वेल्समध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या प्रतिदिन रुग्णांमध्ये वर्षातील सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे. तसेच देशभरातील अनेक प्रमुख शहरातील रहिवांशाना स्नॅप लॉकडाउनमधून मुक्त करण्यात आले आहे.
न्यू साउथ वेल्सची राजधानी सिडनीची लोकसंख्या सुमारे 25 लाख आहे. मागील दोन आठवडय़ांदरम्यान येथे देशभरात सर्वाधिक डेल्टा कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. सद्यकाळात एकूण रुग्णांची संख्या 250 हून अधिक झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. सद्यकाळात आयसोलेशनमध्ये असलेल्या लोकांवर आम्ही अधिक लक्ष देत आहोत. लोक आमच्याकडून मदतीची अपेक्षा करत असल्याचे प्रांताचे प्रीमियर ग्लेडिस बेरेजिकेलियन यांनी म्हटले आहे.
सिडनीमध्ये दोन आठवडय़ांचे लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. लॉकडाउन वाढविण्यासंबंधी आताच निर्णय घेणे घाईचे ठरणार आहे. आरोग्यतज्ञ दैनंदिन स्वरुपात सल्ला देत आहेत. पुढील काही आठवडय़ांमध्ये स्थिती कशी आहे हे लोकांना सांगता येणार असल्याचे ते म्हणाले.
तर पश्चिम ऑस्ट्रेलिया, उत्तर क्षेत्र आणि क्वीन्सलँड प्रांतातील काही क्षेत्रांमध्ये शुक्रवारी रात्री लॉकडाउन समाप्त झाल्यावर लोकांनी विकेंडचा आनंद घेतला आहे. क्वीन्सलँड प्रीमियर अन्नास्तासिया पलास्जजुक यांनी ब्रिस्बेनमधील लॉकडाउन शनिवारी हटविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
लॉकडाउन आणि कठोर सोशल डिस्टन्सिंग नियमांमुळे ऑस्ट्रेलिया कोरोना संक्रमणाला आळा घालण्यास यशस्वी ठरला आहे. पण वेगाने वाढणाऱया डेल्टा व्हेरियंट संक्रमणाने देशात धोक्याचे संकेत दिले आहेत. याला सामोरे जाण्यासाठी ऑस्ट्रेलियात लसीकरण गतिमान करावे लागणार आहे.