सिडनी शहरामध्ये कठोर निर्बंध लागू
वृत्तसंस्था /सिडनी
कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्ध जिंकलेल्या देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाउनचे संकट उभे ठाकले आहे. कोरोना विषाणूच्या अत्यंत संक्रमक डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा लॉकडाउन लागू करावे लागत आहे. जवळपास सुरळीत स्थितीत परतलेल्या ऑस्ट्रेलियामधील सर्वात मोठे शहर सिडनीमध्ये शनिवारी दोन आठवडय़ांसाठी लॉकडाउन जाहीर झाला आहे.
ऑस्ट्रेलियात कोरानाच्या डेल्टा व्हेरियंटचा प्रकोप वेगाने वाढत आहे. याचा फैलाव रोखण्यासाठी तेथे दोन आठवडय़ांचे कठोर लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. सिडनीत कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचे आतापर्यंत एकूण 80 रुग्ण सापडले आहेत.
सिडनी शहरातील 10 लाखांहून अधिक लोकसंख्या सध्या लॉकडाउनला सामोरे जात आहे. शहरात डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण वाढत असल्याने लॉकडाउन लागू करणे आवश्यक ठरले होते, असे आरोग्य अधिकाऱयांचे म्हणणे आहे. दोन आठवडय़ांपूर्वी संक्रमित झालेल्या एका कारचालकाशी संबंधित 65 रुग्ण सिडनीत आढळून आले आहेत. हा कारचालक आंतरराष्ट्रीय विमान सेवेत कार्यरत कर्मचाऱयांना सिडनी विमानतळावरून क्वारेंटाईन हॉटेलपर्यंत घेऊन गेला होता.