वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक लोकसंख्या असलेला प्रांत न्यू साउथ वेल्स अनेक दशकांनंतर भीषण पुराला सामोरा जात आहे. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे लाखो लोकांना स्वतःचे घर सोडावे लागले आहे. तर हवामान विभागाने या भागांमध्ये आणखीन काही दिवसांपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. सरकारने सखल भागात राहणाऱया लोकांना त्वरित घर रिकामी करत सुरक्षित भागात जाण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यू साउथ वेल्स प्रांत आपत्कालीन सेवेने शनिवारी मदतीसाठी करण्यात आलेल्या 640 कॉल्सना प्रतिसाद दिला असून यातील 66 कॉल्स पुरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी करण्यात आले होते. शेकडो लोकांना वाचविण्यात आले आहे. अशी आपत्ती सुमारे 100 वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. प्रांताच्या मध्य उत्तर किनाऱयाच्या अनेक स्थानांवरून लोकांना बाहेर काढुन सुरक्षित स्थळी पोहोचविण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रांताचे प्रीमियर ग्लेडिस बेरेजीक्लियन यांनी दिली आहे.
या पुरामुळे सिडनी शहराच्या काही भागांमध्ये राहणारे लोकही प्रभावित झाले आहेत. पूरग्रस्त भागात स्थानिक पोलीस आणि मदत-बचाव यंत्रणा गस्त घालत आहेत. स्थानिक अधिकारी लोकांना पूरग्रस्त क्षेत्रांमध्ये न जाण्याचे आवाहन करत आहेत.
सिडनी शहरात पाण्याचा पुरवठा करणाऱया वार्रगंबा धरणातील पाणीसाठा विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. 2016 नंतर पहिल्यांदाच धरण ओसंडून वाहत आहे. गुरुवारपर्यंत पुरापासुन कुठल्याच प्रकारचा दिलासा मिळणार नाही. कारण आगामी काही दिवसांमध्ये सातत्याने पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.