वृत्तसंस्था/ मँचेस्टर
विश्वचषक विजेत्या यजमान इंग्लंडने रविवारी येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 24 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बुधवार दि. 16 रोजी होणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून आघाडी मिळविली होती. या दुसऱया सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 9 बाद 231 धावा जमविल्या. इंग्लंडच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक गाठता आले नाही. त्यानंतर इंग्लंडच्या वोक्स, आर्चर आणि करन या वेगवान त्रिकुटाच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाला 232 धावांचे आव्हान पेलवले नाही. ऑस्ट्रेलियाचा डाव 48.4 षटकांत 207 धावा आटोपल्याने इंग्लंडने हा सामना 24 धावांनी जिंकून मालिकेतील आपले आव्हान जिवंत ठेवले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ सुरवातीला भक्कम स्थितीत होता. 30.5 षटकांत त्यांची स्थिती 3 बाद 144 अशी समाधानकारक होती. यावेळी ऑस्ट्रेलियाला विजयाची अधिक शक्यता होती. पण त्यानंतर जोरदार घसरगुंडी सुरु झाली. त्यांचे शेवटचे सात फलंदाज 63 धावांत बाद झाले.
इंग्लंडच्या डावामध्ये कर्णधार मॉर्गनने 52 चेंडूत 42, रूटने 73 चेंडूत 39, करेनने 39 चेंडूत 37, अली रशीदने 26 चेंडूत नाबाद 35, वोक्सने 39 चेंडूत 26 तर रॉयने 22 चेंडूत 21 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियातर्फे झंपाने 3, स्टार्कने 38 धावांत 2 बळी मिळविले.
हॅजलवूड, कमिन्स आणि मार्श यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. टॉम करेन आणि अली रशीद यांनी नवव्या गडय़ासाठी 76 धावांची भागीदारी केल्याने इंग्लंडला 231 धावांपर्यंत मजल मारता आली.
ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकून मालिका हस्तगत करण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीसमोर त्यांचे शेवटचे सात फलंदाज लवकर बाद झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
कर्णधार फिंचने 105 चेंडूत 73 तर लेबुसिंघेने 59 चेंडूत 48 आणि कॅरेने 41 चेंडूत 36 धावा जमविल्या. सलामीचा वॉर्नर आर्चरच्या गोलंदाजीवर 6 धावांवर झेलबाद झाला. स्टोनीसने 9 धावा केल्या. फिंच आणि लाबुशाने यांनी तिसऱया गडय़ासाठी 107 धावांची भागिदारी केली. वोक्सने लाबुशानेला पायचीत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला. फिंच पाचव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला.
कर्णधार मॉर्गनने गोलंदाजीत योग्य बदल केल्याने ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकता आला नाही. इंग्लंडच्या दौऱयावर वॉर्नर पुन्हा अपयशी ठरला आहे. गेल्या चार डावामध्ये तो सातत्याने लवकर बाद झाला. 30 षटकानंतर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 120 चेंडूत 89 धावांची जरूरी होती. दरम्यान मॉर्गनने वोक्स आणि आर्चर यांना दुसऱया हप्त्यातील गोलंदाजीसाठी आणले आणि या दोघांनी 21 चेंडूत ऑस्ट्रेलियाचे चार बळी मिळविल्याने इंग्लंडला हा सामना जिंकता आला. ऑस्ट्रेलियन संघातील स्टीव्ह स्मिथ जखमी असल्याने पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नाही. आता या मालिकेतील निर्णायक सामन्यासाठी स्मिथचे संघात पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड 50 षटकांत 9 बाद 231 (मॉर्गन 42, रूट 39, करेन 37, अली रशीद नाबाद 32, वोक्स 26, रॉय 21, झंपा 3-36, स्टार्क 2-38, हॅजलवूड, कमिन्स आणि मार्श प्रत्येकी 1 बळी).
ऑस्ट्रेलिया 48.4 षटकांत सर्वबाद 207 (फिंच 73, लाबुशाने 48, कॅरे 36, कमिन्स 11, वोक्स 3-32, आर्चर 3-34, करन 3-35, रशीद 1-67).