वृत्तसंस्था / साऊदम्पटन
विश्वचषक विजेत्या यजमान इंग्लंडने शुक्रवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा केवळ दोन धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. या सामन्यात इंग्लंडच्या डेव्हिड मॅलेनला ‘सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर आला असून उभय संघात टी-20 चे तीन सामने तसेच या मालिकेनंतर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जाणार आहे. शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. कोरोना महामारीमुळे तब्बल सहा महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता.
इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 162 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 20 षटकांत 6 बाद 160 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना केवळ 2 धावांनी गमवावा लागला. इंग्लंडच्या डावात सलामीच्या बटलरने 29 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 44 तर डेव्हिड मॅलेनने 43 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 66 धावा जमविल्या. बटलरने बेअरस्टोसमवेत सलामीच्या गडय़ासाठी 4 षटकांत 43 धावांची भागिदारी केली. बेअरस्टोने 1 चौकारांसह 8 धावा जमविल्या. मॅलेनने संघाचा डाव सावरला. तो सातव्या गडय़ाच्या रूपात बाद झाला. जॉर्डनने 8 चेंडूत 1 चौकारांसह नाबाद 14, कर्णधार मॉर्गनने 5, बँटनने 8, क्युरेनने 6 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. ऑस्ट्रेलियातर्फे रिचर्डसन, ऍगेर आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कमिन्सने एक बळी मिळविला.
वॉर्नर आणि फिंच या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या डावाला दमदार सुरूवात करून देताना 66 चेंडूत 98 धावांची भागिदारी केली. कर्णधार फिंचने 32 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 46 तर वॉर्नरने 47 चेंडूत 4 चौकारांसह 58 धावा झळकविल्या. स्मिथने 11 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 18 तर स्टोनीसने 18 चेंडूत 1 षटकाराचा नाबाद 23 धावा जमविल्या. इंग्लंडतर्फे आर्चर आणि अली रशीद यांनी प्रत्येकी दोन तर वूडने 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाच्या डावात तीन षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 36 चेंडूत विजयासाठी 39 धावांची जरूरी होती आणि त्यांचे 9 गडी खेळावयाचे होते पण त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 14 चेंडूत चार फलंदाज गमविले. 11 व्या षटकांत फिंच बाद झाल्यानंतर तिसऱया क्रमांकावर फलंदाजीस आलेला स्टीव्ह स्मिथ 14 व्या षटकातील दुसऱया चेंडूवर, मॅक्सवेल 14 व्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर आणि वॉर्नर 15 व्या षटकांतील दुसऱया चेंडूवर बाद झाले. कॅरे 16 व्या षटकांतील तिसऱया चेंडूवर तंबूत परतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी केल्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 5.4 षटकामध्ये एकही चौकार नोंदविता आला नाही. इग्लंडच्या क्यूरेनने शेवटचे षटक टाकले. या षटकांत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 15 धावांची जरूरी होती. स्टोनीसने या षटकांतील दुसऱया चेंडूवर षटकार खेचला त्यामुळे ऑस्ट्रेलियाला शेवटच्या 4 चेंडूत 9 धावांची जरूरी होती. या शेवटच्या षटकांतील तिसऱया चेंडूवर ऑस्ट्रेलियाला धाव मिळाली नाही. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी शेवटच्या तीन चेंडूत केवळ दोन धावा जमविल्याने त्यांना हा सामना गमवावा लागला. 13 मार्च नंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना होता.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड- 20 षटकांत 7 बाद 162 (मॅलेन 66, बटलर 44, जॉर्डन नाबाद 14, बँटन 8, क्यूरेन 6, रिचर्डसन 2-13, ऍगेर 2-32, मॅक्सवेल 2-14, कमिन्स 1-24),
ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 6 बाद 160 (वॉर्नर 58, पिंच 46, स्मिथ 18, स्टोनीस नाबाद 23, आर्चर 2-33, अली रशीद 2-29, वूड 1-31).